टाटा समूह ‘एअर इंडिया’ विकत घेणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

नवी दिल्ली: जे. आर. डी. टाटा यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली "टाटा एअरलाइन्स' म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर "एअर इंडिया' झालेल्या एअरलाइन्सची टाटा समूहाने पुन्हा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टाटा समूहाकडून एअर इंडियामधील 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: जे. आर. डी. टाटा यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली "टाटा एअरलाइन्स' म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर "एअर इंडिया' झालेल्या एअरलाइन्सची टाटा समूहाने पुन्हा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टाटा समूहाकडून एअर इंडियामधील 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, टाटा समुहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांची केंद्र सरकारसोबत एअर इंडियामधील हिस्सा खरेदीसंबंधी चर्चा सुरू आहे. त्यानुसार टाटा समुह 51 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची शक्यता असून उर्वरित 49 टक्के हिस्सेदारी सरकारकडे राहणार असल्याचे वृत्त आहे.

'एअर इंडिया' विक्रीची घाई नको 

एअर इंडियाची सध्या नागरी उड्डाण बाजारपेठेत अवघा 14 टक्के वाटा आहे. सध्या कंपनीवर 50,000 कोटी रुपये कर्जाचा भार आहे. तसेच 4 हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे. यापैकी, ताफ्यातील विमानांची किंमत वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयेएवढी आहे. एअर इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात व्यवहार करत होती. केंद्र सरकारने कंपनीला 2012 साली 42 हजार कोटी रुपयांचे बेलआऊट पॅकेज दिले होते. तेव्हापासून कंपनी आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करीत आहे.

तोट्याची कारणे

1) इंधनाचा वाढणारा खर्च 2) व्याजाचा बोजा 3) लो कॉस्ट कॅरियर कंपन्यांचे आव्हान 4) विमानतळ वापरासाठीचा मोठा खर्च 5) प्रतिसमभाग कर्जाचे मोठे गुणोत्तर 6) रुपया कमकुवत झाल्याने विनिमय दरातील बदलाने येणारा आर्थिक ताण 7) परकीय विमान कंपन्यांना खुले झालेले आकाश

तोट्याची गणिते 
- एप्रिल 2005 नंतर पहिल्यांदा "एअर इंडिया एक्‍स्प्रेस'च्या माध्यमातून 2015-16 या आर्थिक वर्षात "एअर इंडिया'ला 362 कोटी रुपयांचा नफा झाला. 2014-15 या वर्षी कंपनीला 62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

- 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारी "एअर इंडिया' आणि देशांतर्गत वाहतूक करणारी "इंडियन एअरलाइन्स' यांचे विलीनीकरण करून "नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लि.' (एनएसीआयएल) स्थापन करण्यात आली. त्या वेळी या दोन्हीही कंपन्यांचा अनुक्रमे 541 कोटी आणि 240 कोटी रुपये एवढा तोटा होता.

- विलीनीकरणानंतर तोडग्याचे अनेक प्रयत्न झाले. 2015 मध्ये प्रतिविमान कर्मचाऱ्यांचे प्रमाण 120 होते, त्या वेळी जागतिक पातळीवरील हेच प्रमाण 100 होते.

- "एअर इंडिया'च्या स्थैर्यासाठी सरकारने 30 हजार कोटी खर्चूनही डिसेंबर 2015 अखेर तोटा 50 हजार कोटी रुपये होता.

- सरकारने 2012 मध्ये "एअर इंडिया'ला दहा वर्षांत तीस हजार कोटी रुपयांचे तोट्यातून बाहेर येण्यासाठीचे पॅकेज दिले आहे.

- सातत्याने उपाययोजना करूनही "एअर इंडिया'चा तोटा वाढतो आहे. सरकारने त्याचा काही हिस्सा विकल्यानंतर का होईना, त्याचे आरोग्य सुधारेल की नाही, हे येणारा काळच सांगेल. कारण, दिवसेंदिवस खासगी विमान कंपन्यांचे आव्हान अधिक तीव्र होणार आहे.

वाढणारा तोटा
आर्थिक वर्ष ------------------- एकूण तोटा (कोटी रुपयांत)
2010-11 ------------------ 6865.17
2011-12 ------------------ 7559.74
2012-13 ------------------ 5490.16
2013-14 ------------------ 6279.60
2014-15 ------------------ 5859.91