भारतातील या वस्तूंना आहे चीनमध्ये सर्वाधिक मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

पोलादासह हिरे, माणके, मौल्यवान वस्तूंना मागणी 

बीजिंग: भारताच्या चीनमधील निर्यातीत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, ती आता 5.57 अब्ज डॉलरवर गेली आहे. निर्यातीमध्ये वाढ झाली असली तरी व्यापारी तूट मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

पोलादासह हिरे, माणके, मौल्यवान वस्तूंना मागणी 

बीजिंग: भारताच्या चीनमधील निर्यातीत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, ती आता 5.57 अब्ज डॉलरवर गेली आहे. निर्यातीमध्ये वाढ झाली असली तरी व्यापारी तूट मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

चीनने पोलाद वापरामध्ये वाढ केल्यानंतर भारतामधून मोठ्या प्रमाणात लोह खनिजांची निर्यात होऊ लागली; तसेच हिरे व माणकांची निर्यातही वाढली असून, खादी मालाची निर्यात मात्र घटली आहे. चीनच्या सीमाशुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार 2017 सालच्या जानेवारी ते एप्रिलदरम्यान भारत व चीनमधील व्यापारामध्ये सहा टक्‍क्‍यांनी वाढ होऊन तो 26.02 अब्ज डॉलरवर पोचला आहे.

दरम्यान, चीनच्या भारतातील निर्यातीमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. चीनची भारतातील निर्यात 14 टक्‍क्‍यांनी वाढली असून, ती आता 20.45 अब्ज डॉलर झाल्याचे चीनच्या सीमाशुल्क विभागाचे म्हणणे आहे. भारतासाठी व्यापारी तुटीची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. भारताची जानेवारी ते एप्रिलदरम्यानच्या चार महिन्यांतील 14.88 अब्ज डॉलरची व्यापारी तूट चीनसाठी फलदायी असल्याचे मानले जाते.

पोलादाची निर्यात तब्बल तीनशे टक्‍क्‍यांनी वाढली 

भारतातून चीनला होणाऱ्या लोखंडाची निर्यात 1.04 अब्ज डॉलरवर पोचली असून, यामध्ये 45 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे, भारताची पोलादाची निर्यात तब्बल तीनशे टक्‍क्‍यांनी वाढली असून, ती 218 अब्ज डॉलरवर पोचली आहे. भारतातील हिरे, माणके; तसेच मौल्यवान वस्तूंची निर्यात 558 अब्ज डॉलरवर पोचली आहे.