खारफुटी दलदल

खारफुटी दलदल

"चला जायचे का कांदळ वनात".

डॉ. विनोद म्हणाल्या. "चला जाऊ" पण तिथे होडीची काय सोय होऊ शकते? आहे का कोणी ओळखीचे?  असे प्रश्न होते."

आहेत एक ओळखीचे होईल व्यवस्था".

जैतापूर नाटेपुलाखाली असलेल्या बंदरावर आम्ही पोहचलो. अगोदर कल्पना असल्यामुळे कोठारकर आजोबा वाट पहातच होते. यांत्रिक नौका सफारीसाठी बंदरावर नांगर टाकून तयारच होती. परतेपर्यत डोक्यावर सूर्य येणार याची कल्पना आली. सर्व तयारी निशी सर्वजण होडीत बसलो.

मधल्या फळ्या काढतो म्हणजे तुम्हाला पाय सोडून बसता येईल कोठारकर आजोबा काळजी पोटी सांगत होते." ओ भाऊनु बसून घ्या", सोबत उत्तम आणी ड्रायव्हर काकांना उद्देशून आजोबांनी आज्ञा केली, होडी चालू झाली की राहा उभे तोल सांभाळत. या भाऊसनी हाय सवय. मधल्या आडव्या कण्यावर मँडम, उत्तम आणि ड्रायव्हर काकां बसले, मी उभाच होतो. इंजिनचे हँन्डल मारून यांत्रिक नौका चालू झाली.

"ए हर्षआ सुकाणू डावीकडे मार". "कोण हा हर्षा"? एका प्रश्नार्थक नजरेने सर्वजण एकमेकांकडे पाहत आजोबांकडे पाहू लागलो. क्षणात सर्वांची नजर सुकाणूच्या बाजूकडे गेली. पहातो तो एक निरागस कोवळे सहा सात वर्षाचे बालक सुकाणू हाती धरून होते.

कांदळ वनाकडे नौका मार्गक्रमण करत होती. हलक्या लाटांवर नौका हिदळत होती. लांबसमोर कांदळवनांचे समूह स्पष्ट दिसत होते. त्या मागे दिसणारे डोंगर खाडीचे सौंदर्य वाढवीत होते !खाडीचे ते विहंगम नयन रम्य असे ते दृश्य डोळ्यांची पारणे फेडीत होते. कांदळ वनाभोवती उंच निळ्या-भोर आकाशात घारी संथपणे विहार करीत होत्या. आम्ही कांदळवना जवळ येताच टिट्याव ट्याव, टिट्याव ट्याव करीत जागीच टिटव्या भरारी घेत कोणी तरी येतंय असे सूचित करत होत्या. झाडाला लगडलेल्या लांबलचक शेंगा त्याला देठाजवळच असणारे बी छानच दिसत होते. आजूबाजूला कळ्या व फुलांचे घोस खुणावत होते.

नौका डुलत असल्याने फोटो घेणे अवघड होत होते. कोठारकर आजोबा होडी त्या फुलांजवळ जाईल का हो असे विचारताच आजोबाच्या अगोदर सारथ्य करणाऱ्या हर्षने सुकाणू फिरवले. टोकावरून ढोपरभर पाण्यात आजोबा उतरून होडी झाडा जवळ नेली.

"ओ ओजोबा होडी घासली आणखी पुढे नाय जाणार ओट लागलीये रुतून बसेल होडी", सात वर्षाचे बालक एवढे विचारी? पुस्तकी ज्ञान आणि अनुभव यातील श्रेष्ठ कोण असा विचार मनाला चाटून गेला. फुलांचे फोटो इत्यादी सर्व आटपून परतीच्या प्रवासाला निघालो.

किनारपट्टींचे रक्षण हे खारफुटीचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. किनारपट्टीचे संरक्षण होण्यासाठी एका सक्षम यंत्रणेची गरज असते. खारफुटी ही यातील एक महत्वाची यंत्रणा आहे. खारफुटी म्हणजे जणू काही या किनारपट्टीची त्वचा असते व त्वचा जशी आपल्या शरीराची काळजी घेते, तसेच खारफुटी किनारपट्टीचे संरक्षण समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यांपासून करत असतात. खाऱ्या पाण्यात सर्वसाधारणपणे भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळी दरम्यानच्या पट्ट्यात ही वनश्री आढळते. सपुष्प वनस्पतींची उत्क्रांती होत असतानाच काही वनस्पती खाऱ्या पाण्यामध्ये जीवनक्रम पूर्ण करण्याचे गुणधर्म अंगीकारू शकल्या आणि अशा वनस्पतींनी हा समूह बनला आहे. उष्ण कटिबंधातील समुद्रकिना-यावर सागरी लाटांचा प्रभाव असणा-या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे असे यांचे स्वरूप असते. याच कांदळ वनात खेकडे, पाणपक्षी उद मांजरे, माशांच्या प्रजाती इत्यादींचे प्रजनन होत असते. औषधी वापरासाठी सुद्धा ही वनस्पती मोलाची आहे. साधारणपणे २० ते २५ प्रजाती आपल्या पश्चिम किनारपट्टीवर आढळतात. त्सुनामी सारखा प्रलयकारी लाटांनी किनारपट्टी तसेच किनारपट्टी भागाचे प्रचंड नुकसान होते. ते या कांदळवनांमुळे होत नाही.

नौका बंदराजवळ येऊ लागली. नौकेच्या परस्पर विरुद्ध टोकांवरून नौका नियंत्रित करणारे आजोबा व नातू यांनी इंजिन बंद करून नौका बंदराला लावली. हर्षचे कौतुक करुन व कोठारकर आजोबांना धन्यवाद देऊन, या सर्व आठवणी मनाच्या व कॅमेऱ्यात साठवणूक केंद्रात संरक्षित करून पुढील ठिकाणी प्रस्थान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com