सडक नाटकाची शंभरी...

प्रा. योगेश कुदळे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कॉ सफदर हाश्मी यांचा जन्म १२ एप्रिल १९५४ साली झाला. सडक नाटक करताना जीवाची तमा ना बाळगता हौतात्म्य पत्करणारी व्यक्ती म्हणजे सफदर! आणि म्हणूनच या कॉ सफदर हाश्मी यांचा जन्मदिवस देशभरामध्ये 'राष्ट्रीय सडक नाटक दिवस' म्हणून साजरा केला जातो. सांस्कृतिक अंगाने लोक प्रबोधन करण्यासाठी जे माध्यम सफदर हाश्मी यांनी निवडले ते म्हणजे सडक नाटक होय. त्यानिमित्ताने...

मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत आणि समाज यांचे उन्नयन होताना आढळले आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कलावंतानी कलेच्या माध्यमातून मानवी मनाची आणि मेंदूची मशागत करण्याच काम केले आहे. जसजशी कला उन्नत होत जाते, प्रगत होत जाते तसतसे कलावंत आणि समाज देखील प्रगत होत जातात. कलानिर्मितीचे पोषक वातावरण आणि कलावंत नेहमीच कलेच्या पातळीवर सृजनात्मक विचार करून नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो.

कलावंत ज्या समाजात राहतो त्याला भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न, अस्वस्थता कलावंत त्याच्या मेंदूतील सर्जनशील आणि कल्पक विचारांच्या माध्यमातून कलेद्वारे प्रकटीकरण करत असतो. त्यामुळे कला-कलावंत आणि समाज यांना आपण एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही. अशाच लोकप्रबोधनाच्या सांस्कृतिक चळवळीत स्वतःच कलात्मक असं स्वतंत्र स्थान आणि वेगळेपण अधोरेखित करणारा कलाप्रकार म्हणजे सडक नाटक होय.

कोणत्याही कलेचे सादरीकरण तथा प्रात्यक्षिक करत असतांना त्याला सैद्धांतिक ज्ञानाचा आधार असेल तर त्या कृतीला महत्व प्राप्त होते. सडक नाटक कला प्रकाराच्या बाबतीत मात्र थोड वेगळ म्हणता येईल. कारण सडक नाटकाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याला सडक नाटकच म्हणायच की आणखी काय? याबद्दलची स्पष्टता पाहायला मिळत नाही. सडक नाटक संकल्पना म्हणून विकसित होण्यापूर्वी सादरीकरणाच्या माध्यमातून ती पुढे आलेली दिसते. सडक नाटकाची सैद्धांतिक बाजु पुढे येण्यापूर्वी सडक नाटकाचे सादरीकरण करून त्याचे प्रात्यक्षिक स्वरूप जगासमोर आलेले दिसते.

सडक नाटकाचा इतिहास 
सडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केले जाणारे कलेचे प्रकटीकरण होय ! सामान्य माणसाना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ करतांना आढळते.

भारतामध्ये सोंगी भारुड, परावरचे तमाशे, दशावतार इ लोकपरंपरांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जाई. परंतु या लोक कला सडकनाटक म्हणून जरी मान्य केल्या गेल्या नसतील तरी दोन्हीमधील साम्यस्थळ समजून घेण गरजेचे आहे, अर्थातच या लोक परंपरेप्रमाणे लोक प्रबोधन केल जायचं त्याच प्रमाणे सडक नाटकाच्या माध्यमातून देखील प्रबोधन केले जायचे. या लोक परंपरांचे सादरीकरण जिथं जागा उपलब्ध असेल तिथे, मोकळ्या वातावरणात केले जी त्याच प्रमाणे सडक नाटकाचे देखील तसेच आहे. या सडक नाटकाच्या माध्यमातून  प्रबोधन करण्याची जी परंपरा आहे ती खूप मोठी आहे.

जगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही १९१८ साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झालेच्या निमित्ताने मायकोवस्की या नाटककाराच्या मिस्ट्री बुफे या नाटकाने झाली. या नाटकामध्ये रशियन क्रांती मागची भूमिका आणि परिवर्तनाचा विचार या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता. रूढ अर्थाने कमानी रंगमंचावरील (proscenium theatre) या नाटकाचा प्रयोग रशियाच्य चौकामध्ये रस्त्यावरती करण्यात आला असल्याने जगामध्ये हे मान्य केले जाते की सडक नाटकाची सुरुवात या नाटकाच्या माध्यमातुन १९१८ साली करण्यात आली. १९६८ सालामध्ये फ्रान्स मधील विध्यार्थी आणि कामगारांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून सडक नाटकाच्या माध्यमातून निषेध करणे सुरु केले होते. नंतर १९७० च्या दशकात राजकीय प्रचारासाठी सडक नाटकाचा वापर उगोस्लाव्हीयातील राजकीय पथाने केलेला आढळतो.

भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इप्टा (INDIAN PEOPLE THEATRE ASSOCIATION) च्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवारती नाटक करायला सुरुवात केली. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ही चळवळ पाहायला मिळते. दक्षिणेकडे प्रामुख्याने आंध्रप्रदेश मध्ये आंध्र प्रजा नाट्य मंडळी, कर्नाटक मध्ये समुदाया आणि केरळ मध्ये केरला शास्त्र साहित्य परिषद या संघटनच्या माध्यमातून सडक नाटकांच सादरीकरण प्रबोधन केल जायचं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील आव्हान नाट्य मंच सारखे काही गट कार्यरत होते. बंगाल मध्ये बादल सरकार यांच्या पुढाकाराने आंगण मंच (Third Theatre) म्हणून विकसित होत होत तर दिल्ली मध्ये जनम (जन नाट्य मंच ) च्या माध्यमातून सडक नाटक केली जात होती आणि आजही केली जात आहेत. पण आज मात्र देशभरातील सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते. 

राष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day ) आणि कॉ सफदर हाश्मी- 
भारतामध्ये सडक नाटक चळवळीच्या अनुषंगाने ज्या ज्या कार्यकर्त्या कलावंतानी योगदान दिले त्यामध्ये सगळ्यात अग्रणी नाव हे निर्विवादपणे कॉ. सफदर हाश्मी यांचेच असू शकते याबद्दल कोणाचे दुमत असेल असे वाटत नाही. सफदर हाश्मी यांनी समाजातील वाईट चालीरीती, प्रथा तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत विवेकी पद्धतीने केलेला आढळतो. १९७३ साली जनम (जन नाट्य मंच ) या सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली. या जनम चा खरा जन्म झाला तो “मशीन” या सडक नाटकाचे सादरीकरण करून. 
          
सफदर हाश्मी यांना इंग्रजी साहित्याची जाण चांगली होती. ते स्वतः खूप चांगल गायचे. ते कविता लिहायचे, नाटक लिहायचे. अभिनय आणि दिग्दर्शन हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या नाटकांपैकी अत्यंत महत्वाची सडक नाटक म्हणजे, कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकणार औरते, गाव गाव से शहर शहर तक, डी टी सी का धांदली, राजा का बाजा. त्यांनी केलेल्या या सडक नाटकांची लोकानी आणि तत्कालीन सरकारने ही दखल घेतली होती. सफदर हश्मींच्या सडक नाटकांना राज सत्ताही घाबरत असे. त्यांनी लिहिलेली ‘पढना लिखना सिखो ऐ मेहनत करनेवालो’ गाणी आज ही नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आहेत. ‘किताबे कुछ केहना चाहती है’ सारख्या कवितांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी त्यांनी कवितांचे लेखन केले. त्यांच्या नाटकांचा केंद्रबिंदू हा कामगार, कष्टकरी शोषित समाज असायचा.

जनम च्या माध्यामतून ८० सडक नाटकांचे ८५०० च्या वर प्रयोग झालेत. एक जानेवारी १९८९ रोजी उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे ‘हल्लाबोल’ नावाच नवीन सडक नाटक करत असताना मुकेश शर्मा नावाच्या गुंडाने सफदर हाश्मीवर केलेल्या हल्ल्यामध्ये सफदर हाश्मी शहीद झाले. या लढवय्या कलावंत कार्यकर्त्याचा जन्मदिवस त्यांनी दिलेल्या सडक नाटकातील योगदानामुळे राष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day) म्हणून संबंध देशभर साजरा केला जातो.

सडक नाटकाची गरज
सध्या सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते . ती घालवण्याचे काम परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनीच करणे गरजेचे आहे. २०१८ हे सडक नाटक चळवळीचे १०० वे वर्ष आहे. सडक नाटक हे मनोरंजन करणाऱ्याच्या हातचे गुलाम नाही. तो राबणाऱ्या, कष्टनाऱ्या बहुजन समाजाचा कलात्मक हुंकार आहे, ज्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम केले जाते.

परिवर्तावादी चळवळी मग त्या कामगारांच्या असोत, धरणग्रसतांच्या किंवा शेतकऱ्यांच्या असोत की विद्यार्थ्यांची, अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ असो. या साऱ्या चळवळी सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सडक नाटकाचा वापर करताना आढळतात. वरपांगी प्रचारकी वाटणारे सडक नाटक थेट लोकांचे प्रश्न मांडत प्रेक्षकांना भिडते. त्यांना आपलंस करते कारण तो जनसामान्यांचा कला प्रकार आहे. आजही बेरोजगारी, महागाई, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्राची होणारी गळचेपी या परिस्थितीमध्ये किती कलावंत रस्त्यावरती उतरून या संदर्भामध्ये बोलताना दिसतात? मग ही बाब लक्षात घेता सडक नाटक एक प्रभावी मध्यम म्हणून वापरण गरजेच आहे.

झिरो बजट
सडक नाटक करण्यासाठी खर्च लागत नाही. कमानी रंग मंचावरील नाटक सकारात असताना नाटकासाठी लागणारे नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा तसेच ध्वनी यंत्रणा सुसज्ज असं नाटयगृह हवे असते. ती त्या नाटकाची गरज असते. परंतु सडक नाटकामध्ये या साऱ्या गोष्टीना फाटा दिला जातो. सडक नाटकामध्ये काम करणारे कलावंत कार्यकर्ते आपल शरीर आणि आपला आवाज या दोहोंच्या माध्यमातून सडक नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात.

Web Title: Esakal Citizen Journalism Prof. Yogesh Kudale Article