वार्षिक राशिभविष्य | कुंभ - वर्षभर धनलाभ; प्रतिष्ठाही वाढणार

Yearly Horoscope
Yearly Horoscopesakal

नवनवीन शोध लावावेत, त्याचा आपल्याला व इतरांनाही लाभ व्हावा, कमी श्रमात व कमी खर्चात जास्तीतजास्त कामे कशी करावीत, तसेच कितीही कठीण प्रसंग आला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड कसे द्यावे, हे शिकवणारी रास म्हणजे कुंभ. खिशात एक रुपयाही नसताना ऐषारामात कसे राहावे, कुणाकडून कसे काम करून घ्यावे, नोकर आणि मालकवर्गाची मर्जी कशी सांभाळावी, मालकांनी नोकर व कर्मचाऱ्यांना कसे हाताळावे, हे शिकवणारी ही रास. आतापर्यंत जगात जितके शोध लागलेले आहेत, ते सर्व या कुंभ राशीच्या लोकांनी लावलेले आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

कोणतेही काम करताना चोहोकडे लक्ष हवे. एकाच वेळी चार-पाच कामे करण्याची तयारी हवी. कोणतेही काम वाईट नसते. तसेच केव्हाही कोणत्याही कामाच्या वेळी एकाच गोष्टीवर अडून न बसता दुसऱ्या पर्यायांचाही विचार करावा. कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरू नये. कर्मातच परमेश्वर आहे, हे शिकवणारी ही रास. मंगळ, राहू, गुरू व शनी यांचे प्राबल्य असणारी अत्यंत प्रभावी रास मानली जाते. प्रसंग पडल्यास जीवाला जीव देतील; पण चिडले तर जीव घेण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, अशा वृत्तीची ही माणसं असतात. या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे लोक जगाचे कल्याण करू शकतात. अत्युच्च प्रगती करू शकतात.

यावर्षी राशिस्वामी शनी बाराव्या स्थानी आहे. साडेसाती म्हटले की भल्या भल्यांची तारांबळ उडते; पण ती आपल्या प्रगतीची पहिली पायरी असते, हे लोकांना कळत नाही. साडेसातीच्या प्रभावामुळे कोणतेही काम वेळेवर होईलच असे नाही. एखाद्याला दिलेली रक्कम अडकून पडू शकते. किरकोळ कारणावरून मानहानीचे प्रकार घडू शकतात. आध्यात्मिक बाबतीत मात्र चांगले यश मिळेल. ज्या महिन्यात या शनीवरून रवी, मंगळ अशुभ योग होईल, त्या त्या वेळी पोलिस प्रकरणे, शत्रुत्व, हल्ले वगैरे प्रकार घडतील. मार्चपर्यंत राहू चतुर्थ स्थानात आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धडाडीचे निर्णय घेणे जमणार नाही. स्वतःच्या चिकाटीने व जिद्दीने प्रगती करून घ्याल. या राहूमुळे ग्रहणातील तीन पिढ्यांतील पूर्वजांचे दोष दिसतात. त्यामुळे यांनी शापित अथवा बारीक वास्तू विकत घेऊ नयेत. मार्चनंतर राहू तृतीयेत येईल. त्यानंतर परिस्थितीला कलाटणी मिळेल. महत्त्वाची आणि मोठी कामे होऊ लागतील. हातातून गेलेल्या ऑर्डरी पुन्हा परत मिळतील. काही कारणाने नोकरी सुटली असेल तर ती परत मिळेल. भावंडांच्या बाबतीत मात्र जरा काळजी घ्यावी लागेल. त्यांना कोणतेही धाडस करू नका, असे सांगावे.

एप्रिलपर्यंत गुरू तुमच्या राशीतच असल्याने गजकेसरी योग करीत आहे. हा गुरू तुम्हाला सर्व दृष्टीने अनुकूल असून कोणतेही काम अडणार नाही. आर्थिक समस्या जाणवणार नाही. जे काम हाती घ्याल, त्यात यश मिळवाल. मानसिक समाधान मिळेल. एप्रिलनंतर गुरू धनस्थानी आल्यावर आगामी वर्षभर मोठ्या प्रमाणात सतत पैसे मिळत राहतील. कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. घर, जागा, वाहन, वास्तू, सुवर्णालंकार खरेदी करण्यासाठी पैसा जमू लागेल. मुलाबाळांच्या हौशी पुरवू शकाल. समाजात प्रतिष्ठित म्हणून तुमची गणना होईल. आतापर्यंत काही ना काही कारणामुळे तुमच्यापासून दूर जाणारी अथवा तुम्हाला टाळणारी माणसे स्वतःहून पुन्हा जवळ येऊ लागतील. बँक व सोसायट्या कर्ज घ्या म्हणून मागे लागतील. नेपच्यून तुमच्या राशीत असल्याने आगामी कालखंडात ज्या घटना घडतील, त्याचे तुम्हाला आगाऊ ज्ञान होऊन जाईल. हर्षल तृतीयस्थानी असल्याने एखादा नवा शोध लावाल. जगावेगळे काहीतरी करून दाखवावे, एखादा मोठा कारखाना घालावा, सरकारकडून मदत मिळावी, असे विचार तुमच्या मनात येऊ लागतील. त्याला कित्येकांचे सहकार्यही मिळेल.

प्लुटो बाराव्या स्थानी असल्याने तुम्ही सर्व तऱ्हेच्या कटकारस्थानापासून दूर राहणे आवश्यक आहे. गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व आहे. तेच महत्त्व या राशीतील एका विशिष्ट नक्षत्राला आहे. एकदा एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर ती पूर्ण केल्याशिवाय हे लोक राहत नाहीत. एप्रिलनंतर वर्षभर गुरू धनस्थानी असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील. कशालाही कमी पडणार नाही. विवाहासाठीही वर्ष उत्तम आहे.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत जपून राहावे लागेल. शततारका व पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वर्षभर सतत धनलाभ होत राहतील, असे या वेळच्या संक्रांतीचे फळ आहे. राजकारण व सरकारी क्षेत्राशी संबंध असलेल्यांनी या महिन्यात जपून राहणे आवश्यक आहे.

  • फेब्रुवारी - पायावर जखम असावी आणि पुन्हा तेथेच ठेच लागावी, असे ग्रहमान आहे. शनी, मंगळ, शुक्र, बुध बाराव्या स्थानी. हा योग संकटदायक आहे. त्यामुळे अहोरात्र सावध राहून तुम्हाला कामे करावी लागतील. कुणावरही अतिविश्वास ठेवू नका. तसेच कुणाच्या प्रकरणात मध्यस्थी वगैरे करू नका.

  • मार्च - काही व्यावसायिक समीकरणे सुटतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. अडचणी आल्या तरी सर्व कामे होऊ लागतील. मंगळ, शनी अशुभ योग अजून संपलेला नाही, त्यामुळे वाहन जपून चालवा. किरकोळ कारणावरून वादावादी, मतभेद यांना थारा देऊ नका.

  • एप्रिल - धनस्थानी गुरू, शुक्र म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा म्हणता येईल. कोणतेही आर्थिक व्यवहार मोठे यश देऊन जातील. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. या महिन्यात ज्या अत्यंत महत्त्वाच्या शुभ घटना घडतील, त्यांचा परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावर होईल. जे काही कराल त्यातून हमखास धनलाभाचे योग. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

  • मे - घाई-गडबड, धडपड आणि गोंधळ यामुळे काही कामे उलटसुलट होण्याची शक्यता आहे. नातेवाईक काहीतरी विचित्र समस्या घेऊन येतील. आजूबाजूचे शेजारी, मित्रमंडळी अथवा प्रतिष्ठित लोक एखाद्या व्यवसायात भागीदारी करण्यास प्रोत्साहन देतील. कुटुंबात कुणाचे तरी अचानक लग्न ठरण्याची शक्यता. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

  • जून - कुणी कोणताही सल्ला दिला, तरी स्वतःच्या मनाने निर्णय घ्या. बुध, शुक्राचे उत्तम सहकार्य, त्यामुळे ऐषारामी वस्तूंची खरेदी कराल. एखाद्या नव्या ठिकाणी सहल काढण्याची योजना आखाल. शेअर बाजार व तत्सम ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करण्यास गळ घातली जाईल; पण पुढील काळाचा अंदाज घेऊन गुंतवणूक करा. राहू, मंगळाचा बाधिक योग कानाचे विकार निर्माण करेल.

  • जुलै - ग्रहमान विचित्र फलदायक आहे. काही ठिकाणी यश हुलकावणी देण्याची शक्यता. रवि-शनी प्रतियोगामुळे आरोग्याच्या तक्रारी तसेच नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल; पण कोणत्याही परिस्थितीत नोकरी सोडू नका. एखादी रिकामी झालेली जागा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे; मात्र तुम्ही स्वतः प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही.

  • ऑगस्ट - या महिन्यात रवी-बुध- शनीचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. कोणतेही काम अवघड वाटणार नाही. नव्या नोकरीची संधी आल्यास ती अव्हेरू नका. तसेच लग्नासाठी आपण होऊन स्थळ येईल. ते स्वीकारा, पुढे नशीब उजळेल. तुमचे काही गुप्त आर्थिक व्यवहार असतील तर त्यात झालेल्या चुका अथवा खोडाखोडी बाहेर पडेल. त्यामुळे काही जणांवर संशयाची सुई फिरू लागेल.

  • सप्टेंबर - प्रवासात फायदा. हाती घेतलेल्या कार्यात यश. विवाहासाठी योग्य संधी. बेरोजगारांना नोकरी, तसेच आर्थिक मंदी सोसावी लागलेल्यांना पुन्हा नव्याने उभारी देणारे ग्रहमान. कोणतेही काम यशस्वी होईल; पण प्रयत्न-सचोटी आणि प्रामाणिकपणा हे गुण अंगीकारणे आवश्यक.

  • ऑक्टोबर - राशीतच वक्री झालेला नेपच्यून मादक पदार्थांच्या व्यसनाकडे मन वळविण्याची शक्यता आहे. रवी, शुक्र प्रतियोग अत्यंत अवघड कामेही सहज हातावेगळी करण्यास साहाय्य करतील. घराच्या आसपास स्वच्छ वातावरण ठेवल्यास, तसेच जर काही सुधारणा केल्यास आर्थिक भरभराटीचे मार्ग मोकळे होतील.

  • नोव्हेंबर - या महिन्यातील ग्रहमान व्यावहारिक शहाणपण शिकवेल. कमाई व खर्च यांचे गणित कसे सांभाळावे याचे ज्ञान होईल. मनात भरलेली एखादी व्यक्ती अचानक भेटेल, तसेच काही भाग्यवंतांना भरभक्कम पगाराच्या नोकरीचे योग.

  • डिसेंबर - नोकरी-व्यवसायात काहीतरी गडबड गोंधळ होण्याची शक्यता दिसते. कुणाच्याही कट कारस्थानाचे बळी होणार नाही, याची दक्षता घ्या. गुरूच्या आशीर्वादामुळे आर्थिक चणचण भासणार नाही. विवाहासाठी अनुकूल योग. काहींना मुलांच्या कर्तृत्वामुळे प्रसिद्धी व धनलाभाची संधी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com