पेट्रोल पंपचालकांचे आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

मुंबई - अपूर्व चंद्रा समितीच्या शिफारशीनुसार कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून पेट्रोल पंप मालकांनी सुरू केलेले खरेदी बंद आंदोलन शुक्रवारी (ता. 4) मागे घेण्यात आले. तेल कंपन्यांच्या वरिष्ठांबरोबर झालेल्या मॅरेथॉन बैठकीत कमिशन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

केंद्र सरकारने 2011 मध्ये पेट्रोल-डिझेल वितरकांच्या वाढीव कमिशनच्या मागणीसंदर्भात अपूर्व चंद्रा समितीची नेमणूक केली होती. समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी तेल कंपन्यांनी केली नाही. त्याच्या निषेधार्थ पेट्रोल-डिझेल पंपमालकांच्या संघटनेने खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली होती. बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील साडेचार हजारहून अधिक पेट्रोल पंपचालक सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक सुट्टी, दुसरा आणि चौथ्या शनिवारी पंप बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला होता. दरम्यान, वाढीव कमिशनच्या मुद्द्यावर तेल कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, पेट्रोल डिलरची केंद्रीय संघटना व इतर पदाधिकाऱ्यांची आज दुपारी मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत पेट्रोल-डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यावर एकमत झाले.

"आंदोलन मागे घेण्यात आले आहे. चंद्रा समितींच्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. वाढीव कमिशन मंजूर झाले असून 10 नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल. शिवाय, 15 नोव्हेंबरला पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल होणार आहे. त्याचाही फायदा वितरकांना होईल. ठिकाणानुसार कमिशन वेगवेगळे असेल', असे मुंबई पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले.

नवीन कमिशन
पेट्रोल- प्रति लिटर 13.8 पैसे
डिझेल- प्रति लिटर 10 पैसे
* दर सहा महिन्याला कमिशनमध्ये वाढ होणार