संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण दलांसाठी 2.74 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही वाढ 6.2 टक्के आहे. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत भांडवली आराखड्यात 10.05 टक्के वाढ झाली आहे.

संरक्षण दलांच्या तीनही विभागांना नवी शस्त्रास्त्रे, विमाने, लढाऊ जहाजे आणि अन्य लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठीचा भांडवली आराखडा 86 हजार 488 कोटी रुपयांचा आहे. संरक्षण दलांसाठी दोन लाख 74 हजार 114 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यात संरक्षण भांडवलासाठीच्या 86 हजार कोटी रुपयांचा समावेश असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संरक्षण दलांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्यवर्ती प्रवास योजनाही त्यांनी जाहीर केली.

संरक्षण दलांसाठीच्या भांडवली आराखड्यात 9.3 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र, "अर्न्स्ट अँड यंग'च्या "एरोस्पेस अँड डिफेन्स' विभागाचे उपाध्यक्ष अंकुर गुप्ता यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि संरक्षण साहित्याच्या आयातीवरील सीमाशुल्कामुळे आधुनिकीकरणाची गरज पूर्ण होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Web Title: 2.74 lakh crore for defense forces