छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

राजन याने तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोहन कुमार या नावाने बनावट पासपोर्ट काढला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाला पलायन केले. 2015 मध्ये तो इंडोनेशियामध्ये आल्यानंतर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्याला बाली येथे अटक करून भारताच्या ताब्यात दिले होते.

नवी दिल्ली - गॅंगस्टर छोटा राजन व पासपोर्ट विभागातील तीन निवृत्त कर्मचाऱ्यांना आज (मंगळवार) दिल्लीतील विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनाविली. 

दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाने बनावट पासपोर्ट प्रकरणात राजनबरोबर जयश्री दत्तात्रय रहाते, दीपक नटवरलाल शहा आणि ललिता लक्ष्मणन या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दोषी ठरवले होते. आज त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. विशेष न्यायाधीश वीरेंद्रकुमार गोयल यांच्या पीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने राजन सध्या तिहार तुरुंगात असून, जामिनावर मुक्तता झालेल्या इतर तिघांना न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. आता त्यांना सात वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 

राजन याने तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोहन कुमार या नावाने बनावट पासपोर्ट काढला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाला पलायन केले. 2015 मध्ये तो इंडोनेशियामध्ये आल्यानंतर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्याला बाली येथे अटक करून भारताच्या ताब्यात दिले होते. राजन याच्यावर दाखल तब्बल 70 हून अधिक खटल्यांपैकी हा पहिलाच खटला असा आहे, ज्यात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनाविली आहे.