"आप'विरोधातील आदेश तुघलकी पद्धतीचा - यशवंत सिन्हा

पीटीआय
सोमवार, 22 जानेवारी 2018

"राष्ट्रपतींच्या या आदेशामुळे नैसर्गिक न्यायाचा गळा घोटला गेला आहे. कोणाचे ऐकून घेणे नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहणे नाही...ही तर तुघलकशाही आहे,' असे यशवंत सिन्हा यांनी ट्‌वीटरवर म्हटले आहे

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे वीस आमदार अपात्र ठरल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे दोन ज्येष्ठ नेते "आप'च्या मदतीला धावून गेले आहेत. आमदारांना अपात्र ठरविण्याच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्याचा राष्ट्रपतींचा आदेश हा "तुघलकी' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लाभाच्या पदाच्या मुद्यावरून "आप'च्या वीस आमदारांना अपात्र ठरविण्याच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशामुळे दिल्लीत सत्तेवर असलेल्या या पक्षाला मोठा राजकीय फटका बसला आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या व्यक्ती केंद्र सरकारचे हस्तक असल्यासारखे वागत असल्याची टीका "आप'ने केली होती. आज भाजपमधील बंडखोर समजले जाणारे नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे.

"राष्ट्रपतींच्या या आदेशामुळे नैसर्गिक न्यायाचा गळा घोटला गेला आहे. कोणाचे ऐकून घेणे नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहणे नाही...ही तर तुघलकशाही आहे,' असे यशवंत सिन्हा यांनी ट्‌वीटरवर म्हटले आहे. तर, "आप' विरोधात सुरु असलेले हे सूडाचे राजकारण फार काळ टिकणार नाही, अशी टीका शत्रुघ्न यांनी केली आहे.

"तुम्हाला दैवी न्याय लवकरच मिळो, अशी मला आशा असून माझी ती प्रार्थनाही आहे. "आप'ल्याला खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेवा, ज्यावेळी अवघड काळ येतो, त्याचवेळी तो जातही असतो. सत्यमेव जयते, जयहिंद,' असे त्यांनी ट्‌वीटरवर म्हटले आहे.

Web Title: aap yashwant sinha bjp india