तुतीकोरिनमध्ये पुन्हा हिंसाचार 

पीटीआय
गुरुवार, 24 मे 2018

तुतीकोरिनमधील वादात आता चित्रपट अभिनेते रजनीकांत आणि कमल हासन यांनीही उडी घेतली. रजनीकांत यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे लोकांना शांततेचे आवाहन केले, तर कमल हासन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रजनीकांत यांनी या घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

तुतीकोरिन (तमिळनाडू) - स्टरलाइट प्रकल्पाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आज आणखी एकाला पोलिस गोळीबारात जीव गमवावा लागला, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षात अन्य काही जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

पोलिसांच्या कारवाईत काल (मंगळवारी) दहा लोक ठार झाले होते. या कारवाईच्या विरोधात आज अण्णा नगर भागात आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना गोळीबार करावा लागल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत जखमी झालेल्या लोकांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. वेदांता ग्रुपच्या या तांबे प्रकल्पामधून प्रदूषण होत असल्याचे सांगत गेल्या शंभर दिवसांपासून स्थानिक गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

दरम्यान, कालच्या कारवाईत जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी रुग्णालय परिसरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांनी दोन वाहने पेटवून दिली. 

रजनीकांत, कमल हासन यांचीही उडी 
तुतीकोरिनमधील वादात आता चित्रपट अभिनेते रजनीकांत आणि कमल हासन यांनीही उडी घेतली. रजनीकांत यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे लोकांना शांततेचे आवाहन केले, तर कमल हासन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रजनीकांत यांनी या घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

Web Title: again violence in tamilnadu