गौरव यात्रेला अल्प प्रतिसादामुळे भाजप चिंतेत

महेश शहा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

गुजरातमध्ये पारंपरिक "व्होट बॅंक' दूर जाण्याची भीती

अहमदाबाद: कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात दौऱ्यात मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे भाजपला पाटीदार समाजासह अन्य परंपरागत व्होट बॅंक दूर जाण्याची भीती वाटू लागली आहे. तसेच सध्या भाजपने सुरू केलेल्या गौरव यात्रेला राज्याच्या विविध भागांत फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेही भाजपमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

राहुल गांधी यांना पाटीदार समाजाप्रमाणेच आदिवासी बहुल भागातही लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे भाजपला आपला परंपरागत पाटीदार मतदार पक्षासमवेत राहील की नाही, याची चिंता भेडसावत आहे. भाजपचा सध्याचा प्रचार खरं तर फार मरगळलेल्या स्थितीत आहे. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. भाजपने राज्यात सुरू केलेल्या गौरव यात्रेला कोठेच प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर स्थानिक लोकांनी, पाटीदार समाजाने, निदर्शने करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी या यात्रेत अडथळे आणले. यात्रेत भाजपचे मंत्री व आमदारांना धक्काबुक्कीही झाली.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अलीकडेच अनेक योजना व सवलती जाहीर केल्या. व्हॅट कमी करून पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या. नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. त्यातून महिलांना एक लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा केला जात आहे. सरकारने चौदा जिल्ह्यांत सोळा नव्या औद्योगिक वसाहतीदेखील घोषित केल्या आहेत. त्यामध्ये 15 हजार कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जाते. या साऱ्या योजनांचा भाजपला निवडणुकीत लाभ होतो की नाही, हे पाहणे फार महत्त्वाचे असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठापोठ अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आता प्रचाराच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्याची सारी तयारी भाजपच्या केंद्रीय समितीने केली आहे. आज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, केंद्रीय मंत्री उमा भारती दौऱ्यावर होत्या. उद्या (ता. 13) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गौरव यात्रेत सहभागी होणार आहेत. परवा (ता. 14) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुजरातला येत आहेत.