'ईव्हीएम'वर आमचा विश्‍वास नाही : अखिलेश यादव

पीटीआय
शनिवार, 15 एप्रिल 2017

भाजप सरकारला विरोध करण्याची योग्य वेळ आलेली नाही. भाजपला त्यांचा अर्थसंकल्प मांडू द्या आणि योजना जाहीर करू द्या.. त्यावेळी त्यांना विरोध केला जाईल 

लखनौ: ''ईव्हीएम'वर आता विश्‍वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचाच वापर केला जावा,' अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (शनिवार) केली. उत्तर प्रदेशमधील दारूण पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 'ईव्हीएम'वर सडकून टीका केली होती. 

अखिलेश यादव म्हणाले, "या 'ईव्हीएम'मध्ये कधी बिघाड होईल, काहीच सांगता येत नाही. याचे सॉफ्टवेअर कधी निकामी होईल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे अशा यंत्रांवर अवलंबून राहता येत नाही. आमचा 'ईव्हीएम'वर अजिबात विश्‍वास नाही. 'ईव्हीएम' चांगले आहे की वाईट, या वादात मला पडायचे नाही. मतपत्रिकांवर आमचा 100 टक्के विश्‍वास आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुकांमध्ये मतपत्रिकाच वापरल्या जाव्या, अशी आमची मागणी आहे.'' 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत बहुमत मिळविले. यामुळे अखिलेश यादव यांना सत्ता गमवावी लागली. 'जात-धर्म याआधारे समाजात दुही पसरवून ही निवडणूक लढविली गेली. जाती-धर्मावर आधारित आश्‍वासने देऊन मते मिळविण्यात आली. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने जनतेची दिशाभूल केली,' अशी टीकाही अखिलेश यांनी केली. 

गोरखपूरमध्ये एका माणसाला गाडीमध्येच जिवंत जाळण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत. आमची सत्ता असताना असे काही घडले असते, तर माध्यमांनी त्यावरून प्रचंड गदारोळ घातला असता. अँटी-रोमिओ दलांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला हैराण केले जात आहे. पोलिसांवरही हल्ले होत आहेत. या राज्यात कोणता गुन्हा व्हायचा शिल्लक आहे? 
- अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष 

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख ठिकाणी 24 तास वीज, बुंदेलखंडमध्ये 20 तास वीज आणि गावांमध्ये 18 तास वीज देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. याविषयी अखिलेश यादव म्हणाले, "समाजवादी पक्षानेच सत्तेत असताना गावागावांत ट्रान्सफॉर्मर्स आणि वीजकेंद्रे स्थापन केली होती. याचाच वापर करून भाजप आता वीजेचे आश्‍वासन देत आहे.''