दिल्लीत भाजपच्या पाचही मुस्लिम उमेदवारांचा पराभव

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

दिल्ली महापालिकेत 270 जागांपैकी 185 जागांवर भाजपने विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे अद्याप मोदी लाट टिकून असल्याचे पहायला मिळाले.

नवी दिल्ली - दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असताना, दुसरीकडे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पाचही मुस्लिम उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दिल्ली महापालिकेत 270 जागांपैकी 185 जागांवर भाजपने विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे अद्याप मोदी लाट टिकून असल्याचे पहायला मिळाले. आम आदमी पक्ष या निवडणुकीत 45 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिला, तर काँग्रेसला फक्त 30 जागांवर विजय मिळविता आला. भाजपने या निवडणुकीसाठी सहा मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती. यातील एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. पाच उमेदवारांपैकी एकालाही विजय मिळविण्यात यश आले नाही.

भाजपच्या पाच मुस्लिम उमेदवारांचा पराभव झालेल्या भागांमध्ये मुस्लिम नागरिकांची संख्या अधिक आहे. तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कुरैशीनगर भागातून आपच्या शाहीन यांनी भाजपच्या रुबीना बेगम यांचा पराभव केला. जाकीरनगरमधून काँग्रेसच्या शोएब दानिशने भाजपच्या रफी उज्जमा यांचा पराभव केला. तर, दिल्ली गेट येथे भाजपच्या फहीमुद्दीन, मुस्तफाबादमधून साबरा मलिक आणि चौहान बांगर येथून सरताज अहमद यांना पराभव स्वीकारावा लागला.