गिलगिट बाल्टिस्तान प्रकरणी भारताचा पाकला इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

भारताचा गिलगिट बाल्टिस्तान भूभागावरील दावा स्पष्ट करणारे ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाले असून सरकार यासंदर्भात प्रतिज्ञाबद्ध असल्याची स्पष्ट भूमिका स्वराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागास पाकिस्तानचा प्रांत म्हणून मान्यता देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाचे संतप्त पडसाद आज (बुधवार) संसदेत उमटले. भारत त्याचा कोणताही भूभाग असा गमावेल, असा विचारही करणे चुकीचे असल्याचे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले.

बिजु जनता दलाचे नेते भातृहारी महताब यांनी सरकारच्या यासंदर्भातील भूमिकेविषयी आज विचारणा केली. भारताचा गिलगिट बाल्टिस्तान भूभागावरील दावा स्पष्ट करणारे ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाले असून सरकार यासंदर्भात प्रतिज्ञाबद्ध असल्याची स्पष्ट भूमिका स्वराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

पाकिस्तानच्या नियंत्रणातील "गिलगिट - बाल्टिस्तान' या व्यूहात्मक दृष्टया अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भागास पाकिस्तानकडून लवकरच देशातील पाचवा प्रांत म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. पंजाब, सिंध, खैबर पख्तुन्ख्वां आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानचे चार प्रांत आहेत. मात्र गिलगिट बाल्टिस्तानला प्रांत म्हणून घटनात्मक दर्जा देण्याच्या निर्णयामुळे काश्‍मीर भागातील राजकारणावर दुरगामी व संवेदनशील परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर, भारताकडून स्पष्ट करण्यात आलीली भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: Altering Gilgit-Baltistan status unacceptable: India