जवान म्हणतो, तरीही माझे मनोधैर्य ढासळणार नाही

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

'बीएसएफ'चे स्पष्टीकरण 
दरम्यान, संबंधित कर्मचारी सध्या सुटीवर असून तो बिकानेरला आहे. तेथील दृश्‍य दाखविणाराच व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आहे. त्यांना कोणत्याही आधाराशिवाय तक्रार करण्याची सवय असल्याचे "बीएसएफ'तर्फे सांगण्यात आले आहे; तसेच चौधरी हे सुटीवरून परत आल्यावर त्यांची आणि त्यांच्या तक्रारीबाबत चौकशी केली जाईल, असेही सांगण्यात आले.

गांधीधाम (गुजरात) - सीमा सुरक्षा दलातील एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असलेले मद्य बाहेर विकले जात असल्याची तक्रार केली. याबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल न घेतल्याचाही दावा या कर्मचाऱ्याने केला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत जवानांनी तक्रारी नोंदवू नये, असे आवाहन लष्कराने अनेकदा केले असतानाही हा व्हिडिओ अपलोड झाला आहे. 

नवरतन चौधरी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने केलेल्या तक्रारीबाबत चौकशी केली जाईल, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) म्हटले आहे. चौधरी हे कच्छ जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या बटालियनमध्ये कार्यरत असून, त्यांनी 26 जानेवारीला हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

"घटनेने सर्वांना समान अधिकार असताना बीएसएफच्या जवानांना मात्र ते मिळत नाहीत. त्यांनी चांगल्या अन्नाची मागणी केली तरी मोठा गुन्हा केल्यासारखी चौकशी होते. मी अनेकदा तक्रार केली आणि शिक्षा म्हणून माझी बदली केली गेली. मात्र यामुळे माझे मनोधैर्य ढासळणार नाही. तुम्ही बीएसएफमध्ये असताना भ्रष्टाचार करू शकता, मात्र तक्रार करू शकत नाहीत. जवानांनी वाचविलेल्या पैशातूनच येथे त्यांच्यासाठी मद्य आणले जाते. मात्र, ते इतरांना विकले जात आहे. मी याबाबत आणखी पुरावे देऊ शकतो,' असे चौधरी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये काही नागरिक मद्याच्या बाटल्या घेऊन जात असल्याचे दिसत आहे. 

व्हिडीओ गॅलरी