शशिकला यांची पॅरोलवर सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

आजारी पतीला भेटण्यासाठी पाच दिवसांची रजा

बंगळूर: अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांची येथील तुरुंगातून पाच दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्याचा आदेश शुक्रवारी देण्यात आला. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर नुकतीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना भेटण्यासाठी त्यांना पॅरोलवर रजा देण्यात आल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले.

आजरी असलेल्या पतीला भेटण्यासाठी यापूर्वीही त्यांनी पॅरोलवर 15 दिवस सुटका करण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. पण पुरेशी कागदपत्रे सादर न केल्याने त्यांनी मागणी नामंजूर केली होती. त्यानंतर पॅरोलवर तातडीने सुटका करण्यासाठी शशिकला यांनी गुरुवारी (ता.5) पतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तुरुंग प्रशासनाकडे सादर केले होते. ते ग्राह्य मानून आज त्यांना पाच दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. राज्यसभेचे तमिळनाडूचे सदस्य नवनीत कृष्णन यांनी शशिकला यांच्या पॅरोलसाठी हमीपत्र दिले, असे त्यांचे वकील कृष्णप्पण यांनी सांगितले. यासाठी एक हजार रुपयांचे जामीनपत्र जमा करण्यात आले आहे. शशिकला यांची सुटका होणार असल्याने त्यांचे शेकडो समर्थक तुरुंगाबाहेर जमा झाले होते. पॅरोलची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी शशिकला यांचे भाचे व अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते टी. टी. व्ही दिनकरन तुरुंगात पोचले होते. त्यांना पॅरोल मंजूर करण्यासाठी तमिळनाडू पोलिसांनी कर्नाटक सरकारला "ना हकरत' प्रमाणपत्र दिले होते, असे वकिलांनी सांगितले.

अटींवर सुटका
दरम्यान, शशिकला यांना पॅरोलवर तातडीची रजा मंजूर करताना बंगळूर येथील परप्पना अग्रहरा मध्यवर्ती कारागृहातर्फे पाच अटी घालण्यात आल्या आहेत. 7 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीसाठी ही रजा असून शशिकला यांनी केवळ रुग्णालयात जाऊन पतीची भेट घ्यायची आहे. तसेच अर्जात नमूद केलेल्या निवासस्थानीच राहण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात रुग्णालयात किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यास तसेच कोणत्याही राजकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि पक्षाच्या कामकाजात लक्ष घालण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही त्यांना बंदी करण्यात आली आहे.