नोटाबंदीनंतर बँकांवरील दरोडे वाढले

टीम ईसकाळ
शुक्रवार, 10 मार्च 2017

दिल्लीतील दरोड्यांमध्ये लक्षणीय घट झाली. तेथील दरोड्यांची संख्या 13 वरून एकवर आली आहे. महाराष्ट्रातील दरोड्यांची संख्या 15 वरून 13 झाली. 

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशभरातील बँका आणि एटीएम केंद्रांवर दरोडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या दरोड्यांमध्ये झालेल्या लुटींचे प्रमाणही वाढले असल्याचे समोर आले आहे. 

नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये देशभरात एकूण 245 ठिकाणी बँका आणि एटीएमवर दरोडे पडले होते. मात्र, या निर्णयाच्या पश्चात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 271 दरोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहे.

नोटाबंदीनंतर बँका, एटीएम केंद्रांवरील दरोड्यांची प्रकरणे वाढली आहेत का, असा प्रश्न खासदार अश्विनी कुमार यांनी संसदेत विचारला होता. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली आहे. 
सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत दरोड्यांमध्ये 11 कोटी 68 लाख रुपयांची चोरी झाली होती, तर नंतरच्या तिमाहीत डिसेंबरअखेरपर्यंत 12 कोटी 85 लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. 

बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, हरियाना, हिमाचल, जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, ओडिशा, छत्तीसगढ, झारखंड या राज्यांतील दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीतील दरोड्यांमध्ये लक्षणीय घट झाली. तेथील दरोड्यांची संख्या 13 वरून एकवर आली आहे. महाराष्ट्रातील दरोड्यांची संख्या 15 वरून 13 झाली. 

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँका वेळोवेळी सीसीटीव्हीद्वारे बँक व एटीएम केंद्रांची सुरक्षा व्यवस्थांचे परीक्षण करतात. दरोड्यांच्या घटनांमुळे उदभवणारी जोखीम कमी करण्यासाठी ते सुधारणा करतात.