भटिंडामध्ये स्फोटात 3 ठार; दहशतवादी हल्ल्याचा संशय

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मौर मंडी येथे काँग्रेस उमेदवार हरमींदरसिंग जस्सी यांची मंगळवारी रात्री साडेआठ वाजता प्रचारसभा होणार होती. त्यापूर्वी एका कारमध्ये हा स्फोट झाला.

भटिंडा - पंजाबमधील भटिंडा येथे मंगळवारी रात्री एका काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेदरम्यान झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये 4 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी हा स्फोट झाला आहे. मौर मंडी येथे काँग्रेस उमेदवार हरमींदरसिंग जस्सी यांची मंगळवारी रात्री साडेआठ वाजता प्रचारसभा होणार होती. त्यापूर्वी एका कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण ठार झाले असून, सहा जण जखमी झाले आहेत.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत रामरहिम सिंग हे जस्सी यांचे नातेवाईक आहेत. घटनास्थळावरील प्राथमिक चौकशीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता आहे. न्यायवैद्यक पथकाला घटनास्थळी बोलविण्यात आले असून, चौकशी करण्यात येणार आहे, असे पंजाबचे पोलिस महासंचालक सुरेश अरोरा यांनी सांगितले. स्फोटात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, स्फोटाच्या ठिकाणी प्रेशर कुकरही सापडला आहे.