बंदी झुगारून महाराष्ट्राचे नेते बेळगावात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

बेळगाव - सीमावासियांच्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. पण, छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी मार्ग व वाहने बदलत मोटारसायकलीवरून बेळगाव गाठून महामेळाव्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे, सीमावासियांना दिलासा मिळाला असून या घटनेने 1986 च्या कन्नडसक्‍ती विरोधी आंदोलनाची आठवण करून दिली. 

बेळगाव - सीमावासियांच्या महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली. पण, छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी मार्ग व वाहने बदलत मोटारसायकलीवरून बेळगाव गाठून महामेळाव्यात सहभाग नोंदविला. त्यामुळे, सीमावासियांना दिलासा मिळाला असून या घटनेने 1986 च्या कन्नडसक्‍ती विरोधी आंदोलनाची आठवण करून दिली. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळाव्यासाठी मध्यवर्ती म. ए. समिती पोलिस प्रशासनाकडे विनंती करत होती. पण, अखेरपर्यंत या महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली नाही. उलट महामेळाव्यात महाराष्ट्रातील नेत्यांना सहभागी होण्यास बंदी घातली होती. बेळगावकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तरीही शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाची बंदी झुगारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांनी बेळगाव गाठले. 

कोल्हापूरहून बेळगावला येण्यासाठी या नेत्यांनी अनेक मार्ग बदलले, वाहने बदलली, पोषाख बदलले आणि मोटारसायकलवरून नाकाबंदी केलेल्या पोलिसांना चकवा देत महामेळाव्याला हजेरी लावली. "आम्ही अटकेला घाबरत नाही, पण महामेळाव्यात सहभागी होणारच. या भूमिकेतून आम्ही येथे आलो आहोत.' असे सांगून त्यांनी सीमावासियांचा हुरुप वाढवला. 

रविवारी (ता. 12) रात्रीच जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी फतवा काढून महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास बंदी घातली होती. राष्ट्रीय महामार्गासह बेळगावला येणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. सीमांवर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते महामेळाव्याला येणार की नाही, याबाबत लोकांत उत्सुकता होती. पण, पोलिसांना चकवा देत वाहने बदलत महाराष्ट्रातील नेते महामेळाव्यात दाखल झाले. दुपारी एक वाजता माजी आमदार पाटील महामेळाव्यात दाखल झाले. त्यानंतर दहा मिनिटांनी आमदार कुपेकर यांचे आगमन झाले. आमदार कुपेकर यांनी शिनोळीतून कर्नाटक पासिंगच्या वाहनातून बेळगाव गाठले. युनियन जिमखान्यापासून त्या मोटरसायकलीवरून महामेळाव्याला आल्या. 

खासदार महाडिक यांनीही पोलिसांना चकवा देत महामेळाव्याला उपस्थिती दर्शविली. सेनापती कापशीमार्गे पाटणे क्रॉस ते शिनोळीला पोचले. येथून कर्नाटक पासिंगच्या कारमधून शिनोळीतून सुरूते मार्गे गेले. सुरूतेतून राकसकोपमार्गे बेळगुंदी, बेनकनहळ्ळीला पोचले. तेथून सावगावमार्गे मंडोळीत पोचले. येथून दुचाकीवरून भवानीनगरमार्गे व्हॅक्‍सिन डेपो मैदानात पोचले. खासदार धंनजय महाडिक पावणेदोन वाजता व्यासपीठावर दाखल होताच उपस्थितांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. अशाच प्रकारे माजी मंत्री जयंत पाटील यांनीही गनिमी काव्याने महामेळावा गाठला. 

पवार, भुजबळांचा कित्ता गिरवला 
1986 साली कन्नडसक्‍तीविरोधी आंदोलनात सहभाग घेण्यावर महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घातली होती. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. पण, ही बंदी झुगारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनी वेषांतर करून बेळगाव गाठून आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. पण, या आंदोलनाची आठवण महामेळाव्यात झाली. 

तीस मावळ्यांची कामगिरी 
महाराष्ट्रातील नेत्यांना महामेळाव्यास्थळी आणण्याचे आणि त्यांना सोडण्याची जबाबदारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 30 मावळ्यांवर सोपविली होती. या मावळ्यांनी गनिमी काव्याने आणि पोलिसांना चकवा देत सोपवलेली कामगिरी चोख बजावली. याशिवाय कोवाड, शिनोळी आणि आजऱ्यातील आमदार, खासदारांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांना चकवा देत नेत्यांना महामेळावास्थळी आणले.