बेळगाव जिल्ह्यातील चार नव्या तालुक्यांचे कामकाज 1 जानेवारीपासून

बेळगाव जिल्ह्यातील चार नव्या तालुक्यांचे कामकाज 1 जानेवारीपासून

बेळगाव - जिल्ह्यातील निपाणी, मुडलगी, कागवाड व कित्तूर या चार नव्या तालुक्‍यांचे कामकाज १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्य महसूल खात्याच्या मुख्य सचिवांनी १५ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात नव्या तालुक्‍यांच्या ठिकाणी प्रशासकीय इमारत व आवश्‍यक यंत्रणा तयार ठेवण्याची सूचना दिली आहे. १ जानेवारीपासून नव्या तालुक्‍यांच्या मुख्यालयांचे प्रशासकीय कामकाज सुरू होईल. त्यासाठी आवश्‍यक ती सर्व पूर्वतयारी करण्याची सूचनाही दिली आहे. 

जिल्ह्यातील कित्तूर तालुक्‍याची घोषणा आधीच झाली होती. २०१७-१८ मध्ये निपाणी, कागवाड व मुडलगी या तीन नव्या तालुक्‍यांची भर त्यात पडली. १ जानेवारीपासून या चारही तालुक्‍यांचे स्वतंत्र कामकाज सुरू होईल. निपाणी शहर व परिसर सध्या चिक्‍कोडी तालुक्‍यात आहे. कागवाड शहर व परीसर अथणी तालुक्‍यात तर मुडलगी गोकाक तालुक्‍यात आहे. कित्तूर हे बैलहोंगल तालुक्‍यात आहे.

१ जानेवारीपासून या चारही ठिकाणी स्वतंत्र तालुका मुख्यालय सुरू होईल. या तालुक्‍यांमध्ये कोणत्या गावांचा समावेश होणार हे निश्‍चित झाले आहे. आता शासनाने या तालुक्‍यांबाबत अंतिम अधिसूचना जारी केल्यामुळे नव्या तालुक्‍यांचे कामकाज नव्या वर्षात स्वतंत्रपणे सुरू होईल. चारही ठिकाणी आधीपासून स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांचा ढोबळपणे नव्या तालुक्‍यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्या चार तालुक्‍यांमुळे बेळगाव जिल्ह्यातील तालुक्‍यांची संख्या दहावरून चौदा होणार आहे. 

जिल्हा विभाजनाची होणार मागणी
जिल्ह्यात आधी दहा तालुके व अठरा विधानसभा मतदारसंघ होते. आता मतदारसंघांची संख्या कायम राहील व तालुक्‍यांची संख्या चौदा होईल. तालुके वाढल्याने जिल्हा विभाजनाच्या मागणीला जोर येणार आहे. चिक्‍कोडी स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीसाठी १ जानेवारीनंतर नव्याने प्रयत्न सुरू होण्याची शक्‍यता आहे. बेळगावसह बंगळूर शहर, कोलार, चिक्कमंगळूर, दावणगेरे, म्हैसूर, चामराजनगर, मंगळूर, उडुपी, गदग, हावेरी, धारवाड, कारवार, बागलकोट, विजापूर, बळ्ळारी, बिदर, गुलबर्गा, यादगीर, कोप्पळ व रायचूर या जिल्ह्यांमध्येही नव्या तालुक्‍यांची निर्मिती केली आहे. या सर्व तालुक्‍यांचे कामकाज १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com