बेळगावातील उद्योजक शैलेश जोशी यांची आत्महत्या

संजय सूर्यवंशी
सोमवार, 4 जून 2018

बेळगाव - बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश शरद जोशी वय (40 रा. अमृत मलम फॅक्टरी पाईपलाईन रोड, बेळगाव) यांनी आत्महत्या केल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली.

बेळगाव - बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व अमृत फार्मास्युटिकल्सचे मालक शैलेश शरद जोशी वय (40 रा. अमृत मलम फॅक्टरी पाईपलाईन रोड, बेळगाव) यांनी आत्महत्या केल्याची घटना आज मध्यरात्री उघडकीस आली. दोनच्या सुमारास त्यांनी छातीत गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले, तरी त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की उद्योजक शैलेश जोशी गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांमधून निराश होते. यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आज मध्यरात्री त्यांनी  स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक व घरातील लोक जागे झाले. त्यावेळी जोशी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले  परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.  याप्रकरणी कॅम्प पोलिसात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक प्रकाश निकम अधिक तपास करीत आहेत.

सामाजिक कार्यात अग्रेसर
स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांनीही व्यसनापासून दूर राहावे, यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. 1938 मध्ये त्यांची आजी माई जोशी यांनी स्थापन केलेली अमृत फार्मास्युटिकल्स त्यांचे वडील शरद जोशी यांनी वाढविली. परंतु, कर्नाटक महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अमृत फार्मास्युटिकल्सचे नाव शैलेश जोशी यांनी नेले. यशस्वी उद्योजक म्हणून  त्यांनी चांगले नाव कमावले होते. जाणता राजकारणी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा तरुण उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण बेळगावकरांना धक्का बसला आहे.

आज सोमवारी पहाटे कॅम्प पोलिसात घटनेची नोंद झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर  मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Belgaum News Shilesh Joshi Suicide