कारवार जिल्हा धगधगताच

कारवार जिल्हा धगधगताच

बंगळूर -  संघ परिवाराचा कार्यकर्ता परेश मेस्ता यांच्या गूढ मृत्यूच्या निषेधार्थ भाजप व हिंदू संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता शिर्शीपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी (ता. १२)  शिर्शीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी लाठीमार आणि हवेत गोळीबार केला. ८० पेक्षा अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

परेश मेस्ता यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ११) भाजपने कारवार जिल्हा बंदचे आवाहन केले होते. त्याला हिंसक वळण लागून कुमठा येथे जोरदार दगडफेक व लाठीमार झाला. त्यात काही पोलिस अधिकारीही जखमी झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे वाहनही जाळण्यात आले. मंगळवारी आंदोलनाचे पडसाद शिर्शीत उमटले.

कारवार जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १२) तीन दिवस जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. काही कार्यकर्ते आदेश धुडकावत परेश मेस्ताच्या मृत्यूला न्याय देण्याची मागणी करून रस्त्यावर उतरले. त्यांनी निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्याबरोबर आंदोलनकर्ते खवळले व त्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यामध्ये काही आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले.

त्यानंतर आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर टायर जाळून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काहींनी जोरदार दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यामध्ये ६ अग्निशामक वाहने व काही दुकानांची मोडतोड झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. तरीही आंदोलकांनी दुकाने व हॉटेलवर दगड व बाटलीफेकीचे प्रकार चालूच ठेवले. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. शिर्शीच्या मारीगुड्डी चौकाजवळ आमदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यासह ८० आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआय चौकशी करा

बंगळूर : राज्यात वीसपेक्षा अधिक हिंदू नेत्यांची हत्या झाल्याचा आरोप करून त्यांची सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली. मंगळवारी (ता. १२) यासाठी राजभवन चलो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विधानसौधसमोरील आंबेडकरांच्या पुतळ्यापासून राजभवनापर्यंत भाजप नेते व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. यावेळी बोलताना खासदार शोभा करंदलांजे म्हणाल्या, परेश मेस्ता हत्या प्रकरणात पोलिसांकडून मानव हक्काचे उल्लंघन झाले आहे. किनारपट्टी प्रदेशात इसिसकडून नेमणूक प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. परंतु सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मेस्ता यांच्या हत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला.

कुमारस्वामींचा आरोप
मेस्ता यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण मोठे करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. या संदर्भात भाजप व काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली. जनतेत भीती निर्माण करण्याचे काम दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून होत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा चेहरा राक्षसी : केंद्रीय मंत्री हेगडे
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चेहरा राक्षसी आहे. राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी एकदा आरशात डोकावले तर त्यांचे चेहरेही राक्षसी असल्याचे दिसून येईल, अशी टीका केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी (ता. १२) केली. होन्नावरमधील परेश मेस्ता हत्येची चौकशी केंद्र शासनाकडून व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अथणीतील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री हेगडे बेळगावला आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात आतापर्यंत २० जणांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांची चौकशी राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने निष्पक्षपणे केलेली नाही. परेश मेस्ता हत्या प्रकरणातही राज्य शासनाकडून निष्पक्ष चौकशी होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळेच, मेस्तासह २० हत्या प्रकरणांचा तपास केंद्राकडून व्हावा, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे हेगडे त्यांनी सांगितले. सोमवारच्या कारवार जिल्हा बंदमध्ये दहा हजारांहून अधिक लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हते. तर परेश मेस्ता यांच्या हत्येचे साक्षीदार होते. 

जातीय संघर्षाला भाजपच कारणीभूत : गृहमंत्री
आगामी विधानसभा निवडणुकीत वाममार्गाचा वापर भाजपच्या काही नेत्यांकडून होत आहे. जातीय संघर्षाला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी चालविले असल्याचा आरोप गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी चिक्कबळ्ळापूर येथे केला. मंगळवारी (ता. १२) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहमंत्री म्हणाले, आज राज्यात सुरू असलेल्या जातीय संघर्षाला भाजपचेच पाच-सहा नेते कारणीभूत आहेत. अलीकडेच व्हायरल झालेला प्रताप सिंह व ईश्वरप्पा बोलतानाचा व्हिडिओ पहा, म्हणजे वस्तुस्थिती लक्षात येईल. अनंतकुमार हेगडे यांचे भाषण पहा, ते ऐकल्यानंतर ते सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत का, असा प्रश्न पडतो. शोभा करंदलांजे तर स्वत:ला डॉक्‍टर समजतात. होन्नावरचा युवक परेश मेस्ता याचे शव पाहिल्यानंतर हे नेते किती खरे बोलतात, याची प्रचिती येते. राक्षस म्हणणाऱ्यांनी स्वत:चा चेहरा पहावा. मंगळूर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहून भाजप नेते बेचैन झाले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा राक्षसासारखा आहे, असे सांगणाऱ्यांनी स्वत:चा चेहरा प्रथम आरशात पहावा व नंतर वक्तव्य करावे, असा त्यांनी सल्ला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com