कवटीला 14 एमएमचे ड्रिल.. मेंदुवर शस्त्रक्रिया.. रुग्ण गिटार वाजवताना..!

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

ही समस्या रुग्ण गिटार वाजविण्याचा प्रयत्न करत असतानाच उद्‌भविली होती. यामुळे मेंदुचा बिघाड झालेला नेमका भाग शोधून काढण्यासाठी "रिअलटाईम फीडबॅक' मिळणे आमच्यासाठी आवश्‍यक होते

बंगळूर - कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूर येथील रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यात एक "मेडिकल मिरॅकल' घडले. मेंदुचा गंभीर आजार (न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर) झालेल्या 32 वर्षीय तरुणावर येथे सुमारे सात तासांमध्ये एक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुरु असतानाच "ऑपरेशन टेबल'वर रुग्ण गिटार वाजवत होता!

या तरुणास "म्युझिशियन्स डिस्टोनिया' झाल्याचे निष्पन्न झाले होते. या आजारामुळे त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे बधिर झाली होती. म्युझिशियन्स डिस्टोनिया हा आजार वाद्य वाजविणाऱ्या रुग्णाच्या स्नायुंची हालचाल अतिप्रमाणात झाल्याने होतो. या रुग्णास सुमारे दीड वर्षांपूर्वी गिटार वाजवितानाच प्रथमत: स्नायु बधिर झाल्याचा अनुभव आला होता. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये मेंदुचा काही "जाळून' हा आजार दूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही शस्त्रक्रिया सुरु असतानाच रुग्ण गिटार वाजवित असल्याने डॉक्‍टरांना त्याच्या मेंदुमधील नेमका "बिघडलेला भाग' शोधून काढण्यास मदत झाली. ""ही समस्या रुग्ण गिटार वाजविण्याचा प्रयत्न करत असतानाच उद्‌भविली होती. यामुळे मेंदुचा बिघाड झालेला नेमका भाग शोधून काढण्यासाठी "रिअलटाईम फीडबॅक' मिळणे आमच्यासाठी आवश्‍यक होते,'' असे ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठामधील ज्येष्ठ मेंदुविकार तज्ज्ञ डॉ. संजीव सी सी यांनी सांगितले.

""या शस्त्रक्रियेदरम्यान मेंदुमधील बिघाड झालेला भाग जाळून नष्ट करण्यात आला. या शस्त्रक्रियेआधी रुग्णाच्या कवटीमध्ये चार स्क्रू घुसवून डोक्‍याभोवती एक "फ्रेम' निश्‍चित करण्यात आली. यानंतर एमआरआय स्कॅननंतर कवटीस 14 एमएम खोलीचे एक भोक पाडण्यात आले. यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आले,'' असे या रुग्णालयातील मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. शरण श्रीनिवासन यांनी सांगितले.

दरम्यान, या शस्त्रक्रियेमुळे रुग्णास बरे वाटू लागले आहे! ""माझ्या बोटांमधील बधिरपणा 100% नष्ट झाला आहे. या शस्त्रक्रियेनंतर तीनच दिवसांत मी रुग्णालयाबाहेर पडलो आणि आता गिटार वाजविण्यास तयार आहे!,'' अशी आनंदविभोर प्रतिक्रिया त्याने व्यक्‍त केली