मोठ्या हल्ल्यांसाठी 'इसिस'ची चाचणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

मध्य प्रदेश आणि लखनौसारख्या घटनांच्या वेळी आपण एकजूट राहिले पाहिजे आणि अशाप्रकारच्या ताकदींविरुद्ध लढले पाहिजे. आमचे शेजारी आणि देशभरातील दहशतवादी संघटना देशाची स्थिरता आणि शांतता भंग करण्यासाठी अशा प्रकारच्या क्‍लृप्त्यांचा वापर करत आहेत.
- वेंकय्या नायडू, केंद्रीय नागरी विकासमंत्री

रेल्वे स्फोटानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

भोपाळ: भोपाळ-उज्जैन रेल्वे बॉंबस्फोट प्रकरणातील हल्लेखोर "इसिस' या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीने प्रभावित होते आणि ही घटना म्हणजे आणखी मोठे हल्ले घडवून आणण्याच्या दहशतवाद्यांच्या नियोजनाची एक चाचणी होती, असे मध्य प्रदेश सरकारने बुधवारी सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेशमधील रेल्वे बॉंबस्फोट आणि लखनौमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या मुद्‌द्‌यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उद्या (ता. 9) संसदेत निवेदन करण्याची शक्‍यता अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे.

मध्य प्रदेश विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, की स्फोटामध्ये सहभाग असलेले लोक लखनौहून आल होते आणि पॅसेंजर रेल्वेत बॉंब ठेवणे हा नियोजनबद्ध कटाचा एक भाग होता. या स्फोटात किमान 10 लोक जखमी झाले असून, त्यातील तीन जण गंभीर आहेत.

दहशतवाद्यांवर इराक आणि सीरियातील इस्लामिक स्टेट या संघटनेच्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि त्यातूनच त्यांनी हा स्फोट घडवून आणला. हा एक पूर्वनियोजित कट होता, असे चौहान यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सांगितले.

चौहान यांनी काल याप्रकरणी तीन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केल्याचे आणि प्राथमिक चौकशीत ते इसिसशी संबंधित असल्याची माहिती दिली होती. मध्य प्रदेश पोलिस आणि केंद्रीय संस्थांनी अवघ्या पाच तासांत रेल्वे स्फोटामागील लोकांचा बुरखा उघड केला असल्याचे चौहान यांनी बुधवारी सांगितले.

"एनआयए' पथक भोपाळमध्ये
मध्य प्रदेशमधील दहशतवादी हल्ल्याचा संशय असलेल्या रेल्वे स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक बुधवारी भोपाळमध्ये दाखल झाले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी भोपाळपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या शजापूर जिल्ह्यातील जाबरी रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनास्थळाला भेट दिली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय हे अधिकारी मध्य प्रदेश पोलिसांशीही चर्चा करून रेल्वेमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्लाच होता का, याची शाहनिशा करणार आहेत.

Web Title: bhopal railway blast and isis