अर्थमंत्री जेटलींनी राजीनामा द्यावा: यशवंत सिन्हा

arun jaitley
arun jaitley

पाटणा: अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुद्धिचा वापर न करता वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी केली आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, "पॅराडाईज पेपर'प्रकरणी जयंत सिन्हा यांची चौकशी होत असेल तर जय शहा यांचीही चौकशी करा, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी आज सरकारवर केली. एका सामाजिक कार्यक्रमानिमित्त येथे आलेल्या सिन्हा यांनी अर्थमंत्री जेटली यांनी चांगलेच धारेवर धरले.

"पॅराडाईज पेपर'प्रकरणी जयंत सिन्हा यांची चौकशी व्हावी, त्यांच्याविरोधात काही चुकीचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईही करा पण त्याच बरोबर अमित शहा यांचे पूत्र जय शहा यांच्या आर्थिक हेराफेरीचीही चौकशी करा. करबुडवेगिरी करणारे आणि त्यात भागीदार असणाऱ्या सर्वांविरोधात कारवाई व्हायला हवी. महिनाभराच्या आत सरकारने "पॅराडाईज पेपर'प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी. ज्या लोकांची नावे या प्रकरणात उघड झाली आहेत त्यांना दयामाया दाखविता कामा नये, असेही सिन्हा यांनी नमूद केले.

नितीशकुमार लक्ष्य
खासगी क्षेत्रामध्ये आरक्षणाची मागणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही सिन्हा यांनी टीकास्त्र सोडले. नितीश यांच्यात एवढी क्षमता असेल तर त्यांनी संबंधित विधेयक विधानसभेत मंजूर करून ते केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवावे. खासगी क्षेत्रातील आरक्षणासंबंधीचा नियम 1993 मध्येच अस्तित्वात आला आहे. पण नितीश सरकारने या दिशेने कोणतेही काम केलेले नाही असेही त्यांनी सांगितले.

नितीशविरोधक एकत्र
नितीश यांच्याविरोधातील मंडळींनी हळूहळू आपला खांब मजबूत करायला सुरवात केली आहे, माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी आणि आमदार शाम रजक यांनी आज नाराज नेत्यांची बैठक बोलाविली होती. हे दोन्ही नेते संयुक्त जनता दलाचा दलित चेहरा आहेत. या बैठकीमुळे सत्ताधारी पक्षामध्ये काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावर नितीश काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com