बिस्किट लघू उद्योजकांना 'जीएसटी'तून वगळा

biscuit
biscuit

महासंघाची मागणी; कराचा बोजा वाढण्याची भीती

नवी दिल्ली: गरिबांचा आहार मानल्या जाणाऱ्या देशातील बिस्किट उद्योगास प्रस्तावित वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याचा जबर फटका बसणार असून, यामुळे विशेषतः 100 रुपये किलोपेक्षा कमी दराने विकल्या जाणाऱ्या बिस्किट उत्पादकांवर तब्बल साडेतीनशे कोटींनी कराचा बोजा वाढेल. त्यामुळे "जीएसटी'मधून या छोट्या बिस्किट उद्योगाला वगळावे, अशी जोरदार मागणी भारतीय बिस्किट उत्पादक उद्योजक महासंघाने केली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत वर्षाला तीन हजार कोटी रुपयांचे योगदान देणाऱ्या या उद्योगातील स्वस्त बिस्किटांना "जीएसटी'मधून वगळले तर या उद्योगातून सरकारला मिळणारा उत्पन्नाचा वाटा जराही कमी होणार नाही, असा दावा महासंघाचे अध्यक्ष हरेश दोशी यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही महासंघाने पत्रे पाठविल्याचे त्यांनी नमूद केले.
संसदेच्या उद्यापासून (ता. 9) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धात सरकारने "जीएसटी' विधेयकांना वित्तविधेयके या स्वरूपात अंतिम मंजुरी घेण्याचे ठरविले आहे. मात्र "जीएसटी'तील तरतुदींचा फटका बसणाऱ्या विविध उद्योगांनी याविरोधात अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. बिस्किट उत्पादकांनीही आपल्याला "जीएसटी'मधून वगळावे, अशी मागणी केली. देशातील बिस्किट उद्योगाची सध्याची उलाढाल 37 हजार 500 कोटी आहे.

दोशी यांनी सांगितले की, "जीएसटी' लागू झाल्यावर बड्या बिस्किट उत्पादकांना फारसा फटका बसणार नसला तरी, लहान प्रमाणात बिस्किट उत्पादन करणाऱ्या किमान 250 छोटे उद्योग व लाखो कामगारांना त्याचा जबर फटका बसेल. आधीच बिस्किटासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती (साखर, पीठ-मैदा-तेल-तूप) तब्बल सव्वादोनशे टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. या तुलनेत या बिस्किटांची दरवाढ केवळ 75 टक्के झाली आहे. "जीएसटी' लागू झाल्यावर आदीच मंदीत असेलले हे लहान उद्योग कोलमडतील. कारण, त्यांना सरसकट 12 टक्के कर लागेल. म्हणजेच बिस्किटाच्या लघू उत्पादकांवर तुलनेने साडेतीनशे टक्‍क्‍यांची करवाढ होईल. भारतात वेगवेगळ्या ब्रॅंडची किमान 35 लाख टन बिस्किटे विकली जातात.

दोशी म्हणाले की, ग्लुकोज बिस्किटाचे दर 1996 मध्ये 40 रुपये किलो होते. 20 वर्षांनी त्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत किमतीत सव्वादोनशे टक्‍क्‍यांनी वाढ झाली तरी त्यांच्या दरात 75 टक्केच वाढ केली गेली आहे. ग्राहकांची क्षमता पाहून हे भाव यापेक्षा जास्त वाढवलेले नाहीत. मात्र, "जीएसटी' लागू केल्यास दरवाढ व पर्यायाने यातील छोट्या बिस्किट उद्योगाचे कंबरडे मोडणे या घटना अपरिहार्य ठरतील.

कुरकुरीत वास्तव...

3000 हजार कोटी रुपये
बिस्किट उद्योगाचे वर्षाचे योगदान

37 हजार 500 कोटी रुपये
बिस्किट उद्योगाची उलाढाल

35 लाख टन
देशातील बिस्किटांची विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com