'युपी'तील शेतकऱ्यांची फसवणूक; समाजवादी पक्षाची टीका

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही संपूर्ण कर्जमाफी नसून भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही संपूर्ण कर्जमाफी नसून भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते जुही सिंह म्हणाल्या, "शेतकऱ्यांना दिलेले केवळ एक लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. ही कर्जमाफी नाही. त्यांना एवढी घाई का आहे? जर त्यांना आणखी वेळ हवा असेल तर आणखी वेळ घ्यावा. उत्तर प्रदेशची जनता आणि शेतकरी त्यांना वेळ देतील. आम्ही प्रामाणिक लोक आहोत. आम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका. किमान शेतकऱ्यांना तरी मूर्ख बनवू नका. सरकारने कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन केली आहे. ही समिती काय करते हे बघायला हवे.'

देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील शेतकरी कर्जमाफीस मंगळवारी योगी आदित्यनाथ सरकारने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या घोषणेने राज्य सरकारवर सुमारे 36 हजार कोटींचा आर्थिक बोजा पडणार असून, प्रति शेतकरी एक लाखांपर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.