दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला पराभवाचा जोरदार धक्का

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 एप्रिल 2017

दृष्टिक्षेपात निकाल (कंसात एकूण जागा)
उत्तर दिल्ली (103)
भाजप 64, आप-21, काँग्रेस 15, इतर 03

दक्षिण दिल्ली (104)
भाजप 70, आप 16, काँग्रेस 12, इतर 06

पूर्व दिल्ली (63)
भाजप 48, आप 10, काँग्रेस 03, इतर 02

नवी दिल्ली - देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवताना 270 पैकी 185 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 46 जागांवर समाधान मानावे लागले, तर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसची 77 वरून 28 जागांवर घसरगुंडी झाली.

उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या महानगरपालिकांसाठी 23 एप्रिलला 54 टक्के मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत अपक्ष व इतरांना फक्त 11 जागा मिळाल्या असून, यात बहुतांशी भाजपने तिकीट नाकारलेले बंडखोर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल दिल्लीकर जनतेचे आभार मानतानाच भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीचीही प्रशंसा केली. आप नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला.
मतदानोत्तर अंदाजातच भाजपचा विजय स्पष्ट दिसत होता. मात्र, त्या कलांनुसार 200 जागांचा टप्पा गाठण्यात भाजपला यश आले नसले तरी सत्तारूढ पक्षाने आपल्या जागांत 47 ची भर घातली आहे. भाजपने यंदा बहुतांश म्हणजे तब्बल 91 नगरसेवकांची तिकिटे कापली होती. हा दिल्ली प्रयोग कमालीचा यशस्वी ठरल्याने आगामी गुजरात व हिमाचल प्रदेशातही त्याची पुनरावृत्ती होण्याचे संकेत आहेत.

तिवारींचा केजरीवालांना टोला
पक्षाने खासदार व भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांच्यावर दिल्लीची जबाबदारी दिली होती. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपचा हा विजय अनेकांसाठी आत्मपरीक्षण व आत्मचिंतनाचा विषय ठरेल असे वाटते. दिल्ली सरकारने आता सुडाचे राजकारण न करता महापालिकांना त्यांचा न्याय्य आर्थिक वाटा वेळेवर द्यावा. मुख्यमंत्री केजरीवाल यांना जाहीरपणे आमच्याबरोबर चर्चा करण्यास भीती किंवा संकोच वाटत असेल तर एखाद्या एकांत जागीही ते भाजप नेत्यांशी चर्चा करू शकतात, असा टोलाही तिवारी यांनी लगावला.

दरम्यान, मोदी व शहा यांचे दूत म्हणून केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिल्ली भाजप मुख्यालयात येऊन तिवारी, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, श्‍याम जाजू व विनय सहस्रबुद्धे आदींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, केंद्राकडून दिल्लीला कधीही निधी कमी पडू दिला जात नाही. मात्र, राज्य सरकारने महापालिकांना योग्य वेळी निधी दिला पाहिजे.

हुतात्मा जवानांना विजय अर्पण
भाजपने हा विजय सुकमातील नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना अर्पण केला. त्यामुळे विजयाचा जल्लोष करताना नेहमीचे ढोलताशे, नाचगाणे व मिठाई वाटपाला फाटा देण्यात आला. मात्र तिवारी, नायडू, जाजू आदींचे स्वागत शंखनाद करून करण्यात आले. दिल्ली भाजपच्या या निर्णयाने छत्तीसगडमधील हुतात्मा कुटुंबीयांची व जनतेची कृतज्ञता स्वीकार करा, असे सांगून मुख्यमंत्री रमणसिंह यांनी तिवारी यांचे खास दूरध्वनी करून आभार मानले.

अजय माकन यांचा राजीनामा
दिल्लीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला. आगामी वर्षभर आपण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करू, असेही त्यांनी सांगितले. आपला विश्‍वास ईव्हीएमवर नव्हे, तर निवडणूक आयोगावर असल्याचे सांगण्यासही माकन विसरले नाहीत. काँग्रेसचे प्रभारी पी. सी. चाको यांनीही सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा दिला. "आप'चे नेते गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार, ही मोदी लाट नसून, ईव्हीएमची लाट आहे. भाजपने गेली पाच वर्षे ईव्हीएममध्ये कशी गडबड करता येईल, याचा सखोल अभ्यास करून तो प्रत्यक्षात उतरवला.

देशभरात मोदी यांची स्वीकारार्हता वाढत आहे, यावर दिल्लीच्या जनतेने पुन्हा शिक्कामोर्तब केले. नकारात्मक व बहाणेबाजीच्या राजकारणाला थारा देणार नाही, हा दिल्लीच्या जनतेचा स्पष्ट संदेश आहे.
- अमित शहा, भाजप अध्यक्ष

मी तिन्ही महापालिकांतील विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करतो. माझे सरकार दिल्लीच्या भल्यासाठी महापालिकांबरोबर काम करण्यास तयार आहे.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

दृष्टिक्षेपात निकाल (कंसात एकूण जागा)
उत्तर दिल्ली (103) : भाजप 64, आप-21, काँग्रेस 15, इतर 03
दक्षिण दिल्ली (104) : भाजप 70, आप 16, काँग्रेस 12, इतर 06
पूर्व दिल्ली (63) : भाजप 48, आप 10, काँग्रेस 03, इतर 02