मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराअभावी भाजप अडचणीत येईल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कॉंग्रेसकडून हरिश रावत हेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. पण जर सत्तेवर भाजप आला, तर राज्यातील सर्वोच्च पदावरील खुर्चीवर कोण विराजमान होणार याबाबत चर्चा आहे. राज्यात भाजपकडे अनेक दिग्गज नेते कार्यरत आहेत. त्यातून नेता म्हणून कोणाला निवडावे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

डेहराडून : उत्तराखंडमध्ये क्षीण कॉंग्रेसच्या विरोधात भाजप वरचढ ठरत असल्याचे चित्र दिसत असले, तरी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर न केल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात 15 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील मुद्यावर भाजपने प्रचारात भर दिला असला, तरी मुख्यंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न केल्याने हरिश रावत यांना नाही तर कोणाला मत द्यायचे, अशी संदिग्ध स्थिती मतदारांची होईल, असे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे. रावत यांना पर्याय म्हणून भाजपने स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचे नाव पुढे केल्यास मतदारांना निवड करणे सोपे जाईल व पक्षासाठीही उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे.
भाजपमध्ये राज्यात महत्त्वाकांक्षी नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील अनेक जण कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये आलेले आहे. त्यामुळे मतदारांच्या गोंधळात आणखी भर पडेल आणि असे होणे भाजपसाठी धोकादायक ठरू शकते, तर हरिश रावत व कॉंग्रेसच्या पथ्यावर पडू शकते, असे निरीक्षकांनी म्हटले आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच शाहनवाझ हुसेन यांनी राज्यात सभा झाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांत उत्तराखंडच्या प्रचार दौऱ्यावर येणार आहेत.

दरम्यान, भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी त्यामुळे पक्षाच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही. या पदासाठी योग्य असलेले अनेक नेते पक्षात आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाची संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेईल, असे शाहनवाझ हुसेन यांनी बुधवारी (ता. 8) पत्रकार परिषेद बोलताना स्पष्ट केले.

Web Title: bjp may face problem without cm candidate