'बीएसएफ' जवानांना मिळणार पतंजलिची उत्पादने

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

देशातील बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पतंजलिची उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. जवानांना मिळणारी ही सवलत 15 ते 28 टक्के असेल.

नवी दिल्ली - योगगुरु रामदेवबाबा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना योगचे प्रशिक्षण दिल्यानंतर, आता रामदेवबाबांच्या पतंजलि उत्पादनांची दुकाने देशभरातील बीएसएफच्या कॅम्पमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे बीएसएफ जवानही पतंजलिच्या उत्पादनांचा वापर करणार आहेत.

राजधानी दिल्लीतील बीएसएफच्या कॅम्पमध्ये बुधवारी पतंजलीच्या शॉपचे उद्घाटन करण्यात आले. बीएसएफ जवानांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या कल्याण निधी आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडमध्ये पतंजलिची उत्पादने विक्रीला उपलब्ध करण्याबाबत करार झाला आहे. याच्या माध्यमातून देशभरातील बीएसएफच्या कॅम्पमध्ये पतंजलीची उत्पादने उपलब्ध असणार आहेत. 

बीएसएफने याबाबत माहिती देताना सांगितले, की देशातील बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पतंजलिची उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. जवानांना मिळणारी ही सवलत 15 ते 28 टक्के असेल. लवकरच अगरतळा, ग्वाल्हेर, गुवाहाटी, जोधपूर, सिलिगुडी, जालंधर, कोलकता, जम्मू, बंगळूर, सिल्चर, अहमदाबाद, हजिराबाद आणि इंदूरमधील बीएसएफच्या कॅम्पमध्ये पतंजलीचे शॉप्स सुरु होतील.