काश्‍मिरी युवकाला जीपला बांधणाऱ्या मेजर गोगईंचा गौरव 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

काश्‍मिरी बंडखोरांविरोधात केलेल्या शाश्‍वत कारवाईसाठी गोगई यांचा सन्मान केला गेला असल्याचे कर्नल कमल आनंद यांनी सांगितले. लष्करप्रमुख रावत यांच्या काश्‍मीर भेटीदरम्यान मेजर गोगई यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली - काश्‍मिरी नागरिकाला जीपला बांधणारे लष्करी अधिकारी मेजर नितीन गोगई यांना लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडून 'लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्र' देऊन गौरविण्यात आले. 

काश्‍मिरी बंडखोरांविरोधात केलेल्या शाश्‍वत कारवाईसाठी गोगई यांचा सन्मान केला गेला असल्याचे कर्नल कमल आनंद यांनी सांगितले. लष्करप्रमुख रावत यांच्या काश्‍मीर भेटीदरम्यान मेजर गोगई यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. 'लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्र' हा भारतीय लष्करातील मानाचा गौरव समजला जातो. 

श्रीनगर येथे निवडणुकांदरम्यान एका युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. काश्‍मिरी आंदोलक व बंडखोरांच्या दगडफेकीदरम्यान काश्‍मिरी नागरिकाचा ढालीसारखा वापर केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र याप्रकरणी चौकशी केल्यानंतर गोगई यांना क्‍लीन चीट देण्यात आली होती.

मेजर गोगई हे आसाममधील असून, त्यांचे वडील शेतकरी आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी ते लष्करात दाखल झाले होते. आसाम रेजिमेंटमध्ये ते होते. डेहराडून येथील आर्मी कॅडेट कॉलेजमधून उत्तीर्ण होत ते अधिकारी झाले.