बुद्ध शिल्पाचे मुस्लिमांकडून जतन!

बुद्ध शिल्पाचे मुस्लिमांकडून जतन!

कारगिल - जगाला शांततेचा विचार देणाऱ्या गौतम बुद्धांची शिल्पे अफगाणिस्तानमध्ये उद्‌ध्वस्त झाली; पण अशांत नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्‍मीरच्या एका टोकावरील चित्र मात्र वेगळे आहे. कारगिलजवळील संकू गावात बुद्धांच्या शिल्पाचे जतन करतोय मुस्लिम समाज.

कारगिलवरून ‘सुरू’ नदीच्या खोऱ्यात निघाले की पन्नास किलोमीटर अंतरावर संकू गाव आहे. त्याच्याजवळ करस्तेखर हा भाग आहे. तिथे एका पहाडावर कोरलेले गौतम बुद्धांचे तीस फुटी शिल्प आपल्याला पाहायला मिळते. ते सातव्या शतकातील असल्याचे स्थानिक लोक सांगतात. संकू हा तालुका आहे. त्याचा संपूर्ण परिसर हा शेतकरी मुस्लिमांचा आहे. गेली अनेक वर्षे हाच समाज या शिल्पाचे केवळ जतन नव्हे, तर रक्षणही करतो आहे.

तालिबान्यांनी बामियानमधील बुद्धांची शिल्पे दारूगोळा डागून जमीनदोस्त केली. त्या प्रकारातील तीन शिल्पे आता केवळ कारगिल आणि लडाख भागात उरली आहेत.  कारगिलजवळील संकू आणि अपाती, तसेच लेह महामार्गवरील मुलभेक गावात ही शिल्पे पाहायला मिळतात. भारतीय परंपरेतील सामाजिकच नव्हे, तर वैचारिक सलोख्याचेदेखील हे दृश्‍य साक्ष आहे. तीनही गावांमधील बुद्धांची शिल्पे पहाडांमध्ये कोरलेली आहेत. त्यांच्या मुद्रांमध्ये मात्र फरक आहे. या शिल्पांना मैत्रेय बुद्ध असेही संबोधले जाते. संकूमधील शिल्प ही बुद्धांची अभय मुद्रा असल्याचे सांगतात. डाव्या हातात कमंडलू, गळ्यात आणि मनगटाला गुंडाळलेली रुद्राक्षांची माळ, असे सुमारे तीस फुटी हे शिल्प आहे.

जगाला शांतीचे तत्त्व देणाऱ्या गौतम बुद्धांचा विचार शिल्पांच्या रूपाने येथील मुस्लिम समाजाने जपून ठेवला आहे. त्याचे जतन आम्ही करीत आहोत आणि करीत राहणार आहोत. हीच काश्‍मीरची संस्कृती आहे.
- अली वझिरी, स्थानिक नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com