चंद्राबाबूंचाही आता मोदींना टाटा?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही नरेंद्र मोदी- अमित शहा प्रणीत भाजप आघाडीला रामराम करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. लोकसभेत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आंध्रला भोपळा मिळाल्याने चंद्राबाबू संतप्त आहेत. येत्या रविवारी (ता. 4) तेलुगू देसम संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली : शिवसेनेपाठोपाठ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही नरेंद्र मोदी- अमित शहा प्रणीत भाजप आघाडीला रामराम करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. लोकसभेत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आंध्रला भोपळा मिळाल्याने चंद्राबाबू संतप्त आहेत. येत्या रविवारी (ता. 4) तेलुगू देसम संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

''तेलुगू देसम युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहे,'' अशा शब्दांत या पक्षाचे खासदार टी. जी. वेंकटेश यांनी आज हल्लाबोल केला. तेलुगू देसमचे लोकसभेत 16 व राज्यसबेत सहा सदस्य आहेत. अशोक गजपती राजू व वाय. एस. चौधरी हे त्यांचे सदस्य केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. 

चंद्राबाबू नायडू यांच्या रुद्रावतारानंतर भाजप नेतृत्वाने त्यांच्याशी संपर्क केला काय? या प्रश्‍नावर 'अद्याप नाही', असे नायडूंच्या निकटवर्तीयांनी 'सकाळ'ला सांगितले. भाजपमधील हालचालींनुसार मोदी स्वतः उद्या नायडूंशी दूरध्वनीवरून चर्चा करू शकतात. तथापि आंध्रच्या तोंडाला मोदी सरकारने पाने पुसल्याची भावना पक्षाच्या आमदार- खासदारांचीही झाल्याने व त्यांच्याकडूनच युती तोडण्यासाठीचा जबरदस्त दबाव आल्याने चंद्राबाबूंना संभाव्य निर्णय उलटा फिरविणे कितपत शक्‍य होईल, याबाबत साशंकता आहे. 

वेंकटेश म्हणाले, ''आमच्यासमोर तीन पर्याय आहेत - आहे त्या भाजप आघाडीत कायम राहणे, आमचे खासदार व मंत्र्यांनी राजीनामे देणे आणि युती तोडून टाकणे.'' एकूण चित्र पाहता भाजप वा मोदींकडून आता मलमपट्टीची भाषा झाली तरी आंध्रला तातडीने विशेष पॅकेजची घोषणा केंद्राकडून झाल्याशिवाय चंद्राबाबूंची समजूत पटणे अशक्‍य आहे. 

चंद्राबाबू गेली साडेतीन वर्षे वारंवार दिल्लीत येत आहेत. आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर आंध्रला विशेष राज्याचा दर्जा, अमरावती या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्रीय मदत व त्याअनुषंगाने मिळणारा आर्थिक लाभ द्यावा यासाठी त्यांनी किमान 40 वेळा मोदी- शहा, जेटली यांच्या भेटी घेतल्या. ''आंध्र प्रदेशला पुढची 10 वर्षे विशेष दर्जा व त्यानुषंगाने मिळणारा आर्थिक लाभ केंद्राकडून दिला जाईल,'' असे आश्‍वासन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आंध्रच्या विभाजनाचे विधेयक राज्यसभेत मंजूर होताना दिले होते. मोदी सरकारने विशेष दर्जाचा शब्द विशेष पॅकेज असा फिरविला. त्यानंतरही चंद्राबाबूंनी मोदींशी जुळवून घेण्याचे धोरण चालू ठेवले. मात्र अलीकडे त्यांनी भाजपला युतीचा मित्रधर्म पालन करण्याचा सल्ला दिला होता. 

मंत्र्यांचा बहिष्कार? 
कालच्या अर्थसंकल्पानंतर चंद्राबाबू नायडू प्रचंड अस्वस्थ आहेत व त्यांच्या खासदारांकडूनही तीच भावना व्यक्त होते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार युतीबाबत चंद्राबाबूंनी कालपासून पक्षाचे आमदार, खासदार यांच्याशी सातत्याने चर्चा केली आहे. त्यांचे दोन्ही मंत्री शुक्रवारी मंत्रालयातही गेले नसल्याचे समजते. भाजपशी असेलला घरोबा ताणायचा की तोडायचा याचा निर्णय रविवारी होणाऱ्या बैठकीत चंद्राबाबू करतील असे सांगितले जाते.

Web Title: Budget 2018 Union Budget Narendra Modi BJP Lok Sabha 2019 N Chandrababu Naidu