अमरिंदरसिंग यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

अमरिंदरसिंग याच्यासोबत गुरजितसिंग औजला, मनप्रीतसिंग बादल, चरणजीतसिंग छन्नी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 

चंडीगड : काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज (गुरूवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर, निवडणुकीपूर्वी भाजपच्या खासदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 

या शपथविधी समारंभाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. अमरिंदरसिंग याच्यासोबत गुरजितसिंग औजला, मनप्रीतसिंग बादल, चरणजीतसिंग छन्नी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 

काँग्रेसने पंजाबमध्ये अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित मानले जात होते. अमरिंदर सिंग यांनी रविवारी पंजाबच्या राज्यपालाची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शपथविधीसाठी 16 मार्च ही तारीख निश्‍चित करण्यात आल्याचे अमरिंदरसिंग यांनी तेव्हा स्पष्ट केले होते.

काँग्रेसने पंजाबमध्ये एकूण 117 जागांपैकी तब्बल 77 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. तब्बल एक दशकानंतर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी लक्ष घालूनदेखील 'आप'ला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या आणि शिरोमणी अकाली दलासोबत युती केलेल्या भारतीय जनता पक्षाला पंजाबमध्ये कोणताही प्रभाव दाखविता आला नाही. या युतीला केवळ 18 जागांवर यश मिळविता आले.
 

Web Title: Captain Amarinder Singh sworn in as Punjab CM