मोदी कारवाई करा, अन्यथा मी बदला घेईन- वीरमाता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यामध्ये कॅप्टन आयुष यांच्यासह एकूण तीन जवान हुतात्मा झाले असून, अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन आयुष यादव यांनी काल (गुरुवार) दहशतवाद्यांशी लढताना दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या आईने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'पंतप्रधान काही कारवाई करणार नसतील तर मी मुलाच्या मृत्यूचा बदला नक्की घेईन.'

तत्पूर्वी हुतात्मा आयुष यादव यांचे वडील अरुण यादव यांनीही सरकारपुढे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "आम्ही आमचा मुलगा गमावला, परंतु देश कधीपर्यंत असे आपल्या पुत्रांना गमावत राहणार आहे," असे त्यांनी म्हटले आहे. आयुष हा आपला एकुलता एक मुलगा होता असे त्यांनी सांगितले. या हल्ल्याच्या आधीच्या दिवशी म्हणजे बुधवारीच ते कॅप्टन आयुष यांच्याशी फोनवरून बोलले होते. आयुषने वडिलांना श्रीनगरला फिरायला बोलावले होते. परंतु, तिथे खूप दगडफेक होत आहे असे म्हणताच आयुष हसू लागले, अशी आठवण त्यांनी सांगितले. 

काल कुपवाडातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांवर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यामध्ये कॅप्टन आयुष यांच्यासह एकूण तीन जवान हुतात्मा झाले असून, अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.

या वेळी प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये "जैशे महंमद' या संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. तब्बल 35 मिनिटे ही चकमक सुरू होती. दरम्यान या चकमकीनंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरवात केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली होती.