IAS अधिकाऱ्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मयंक यांनी आज आईसोबत जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली.

लखनौ : कर्नाटक केडरचा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनुराग तिवारी यांच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची शिफारस आज उत्तर प्रदेश सरकारने केली. या प्रकरणी तिवारी यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन राज्य पोलिसांच्या तपासाबद्दल असंतोष व्यक्त करीत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

तिवारी यांचा मृतदेह पाच दिवसांपूर्वी रहस्यमय अवस्थेत सापडला होता. बंगळूरू अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागात आयुक्त असताना भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे तिवारी यांनी भिंग फोडल्याने त्यांच्या इशाऱ्यावरूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिवारी यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले असले तरी पोलिस म्हणाले, की विशेष तपास पथक याची चौकशी करीत असून अद्याप व्हिसेराचा आणि रक्ताच्या नमुन्याचा अहवाल येणे बाकी आहे. त्यातून मृत्यूचे नक्की कारण समजून येईल.

हजरतगंजचे मंडल अधिकारी अविनाशकुमार मिश्रा म्हणाले की, तिवारी यांचे भाऊ मयंक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. मयंक यांनी आज आईसोबत जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली. अनुराग तिवारी यांची आई म्हणाली, की अनुरागची हत्या का केली हे समजण्यासाठी आम्ही सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आम्ही पोलिस तपासाबाबत समाधानी नाही, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्यायाचे आश्‍वासन दिले आहे.