नवीन वाहन आता सीएनजीवरच चालणार

नवीन वाहन आता सीएनजीवरच चालणार

दिल्ली- हरियानाच्या मुख्यमंत्र्यांचे एकमत; दिल्ली प्रदूषणावरील उपायांवर चर्चा

चंडीगड : हरियाना आणि दिल्लीत आता जुन्या वाहनांची नोंदणी होणार नसून, नवीन वाहन केवळ सीएनजीवरच चालवण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज हरियाना आणि दिल्ली सरकारने घेतला. दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांनी आपापले मुद्दे मांडले आणि या समस्येवर मात करण्यासंदर्भात उपाययोजनांची चर्चा केली. दोन्ही राज्ये एकत्र येऊन प्रदूषणाचा सामना करणार आहेत.

बैठकीनंतर मनोहरलाल खट्टर आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. बैठकीत धुक्‍याच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी आठ मुद्द्यांवर सहमती झाली. यानुसार आता हरियाना आणि दिल्लीत जुन्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही. शेतात शिल्लक राहिलेला पालापाचोळा, कचरा न जाळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येईल, तसेच कचऱ्याचे विघटनीकरण करणाऱ्या उपकरणांवर सबसिडी वाढवण्यावर एकमत झाले. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत. केजरीवाल म्हणाले, की हवेवर कोणाचेच नियंत्रण नाही. यासाठी उत्तर भारतातील ही समस्या सोडवण्यासाठी सर्व राज्यांची संयुक्त जबाबदारी आहे.

प्रदूषण उत्तर भारताची समस्या आहे. केवळ कचरा जाळणे हेच कारण नाही, तर वाहतूक आणि हवेतूनही प्रदूषण होत आहे. आठ मुद्द्यांवर आम्ही या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी कृती योजना तयार केली आहे.
- मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाना

दिल्ली आणि संपूर्ण एनसीआर धुक्‍याने त्रस्त आहे. समस्येवर निदान करण्यासाठी मला हरियानाच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला, ही चांगली बाब होय. उच्चपदावरील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन राजधानीतील समस्येवर समाधान शोधण्याची गरज आहे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com