वेगळ्या मार्गिकेचा विचार रुग्णवाहिकांसाठी करावा

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

टोल नाक्‍यांवर रुग्णवाहिका आणि महत्त्वाच्या नागरी सेवांच्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका नसल्याने त्यांना घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो, असे म्हणणे याचिकाकर्त्याने मांडले

चेन्नई - तमिळनाडूत टोल नाक्‍यांवर रुग्णवाहिका आणि महत्त्वाच्या नागरी सेवांच्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाला बुधवारी दिले.

ए. पी. सूर्यप्रकाशम यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सुटीकालीन खंडपीठाचे न्यायाधीश आर. महादेवन आणि एम. गोविंदराज यांनी हे निर्देश दिले. याबाबत याचिकाकर्त्याने केलेले सादरीकरण "एनएचएआय' आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने सकारात्मकरीत्या घ्यावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली. टोल नाक्‍यांवर रुग्णवाहिका आणि महत्त्वाच्या नागरी सेवांच्या वाहनांसाठी वेगळी मार्गिका नसल्याने त्यांना घटनास्थळी पोचण्यास विलंब होतो, असे म्हणणे याचिकाकर्त्याने मांडले.
तसेच, याबाबत संबंधित सर्व सरकारी विभागांसमोर सादरीकरण केले होते, असे याचिकाकर्त्याने सांगितले. या प्रकरणी न्यायालयाने निर्देश देऊन आपले सादरीकरण लक्षात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यावर याचिकाकर्त्याचे सादरीकरण पाहून चार आठवड्यांत बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

. . . . . .