छत्तीसगढ : माओवादी हल्ल्यात 11 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

"सुकमातील परिस्थितीविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी मी बोललो. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा येथे जाणार आहेत," असे मोदी यांनी सांगितले. 

रायपूर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी अचानकपणे केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) 11 जवान हुतात्मा झाले, तर 5 जवान जखमी झाले. 

माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्हयातील भेज्जीच्या जंगलात सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोटाचेरू नावाच्या खेड्याजवळ ही घटना घडली. भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे जंगल आहे. जंगलात जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी CRPF च्या 219 बटालियनचे गस्त पथक गेले असताना जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सहायक उपनिरीक्षक हिरालाल जांगडे, आरक्षक नरेंद्रकुमार सिंह, मंगेश पांडे, रामपालसिंह यादव, गोरखनाथ, नंदकुमार अतरम, सतीशचंद्र वर्मा, के. शंकर, वी.आर. मंदे, जगजितसिंह आणि सुरेश अशी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. जखमी जवानांमध्ये जगदीश प्रसाद निसोडे, जयदेव परमाणिक, मो. सलीम यांचा समावेश आहे. चौथ्या जखमी जवानाच्या नावाची अद्याप खात्री झाली नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "सुकमामधील CRPF जवानांच्या मृत्यूने दुःख झाले. हुतात्म्यांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी."

"सुकमातील परिस्थितीविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी मी बोललो. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा येथे जाणार आहेत," असे मोदी यांनी सांगितले.