अखेर प्रियांका गांधी मैदानात उतरल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जुलै 2016

लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कॉंग्रेसला अच्छे दिन आणायचे असतील तर प्रियांका गांधी यांनाच मैदानात उतरवा, प्रियांका हा कॉंग्रेससाठी शेवटचा आशेचा किरण असल्याचे मत कॉंग्रेसचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) यांनी मांडले होते. सध्या उत्तर प्रदेशात विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून, विविध पक्षांनी आपले बालेकिल्ले, नेते निश्‍चित करून ठेवले आहेत. कॉंग्रेसला मात्र प्रदेश पातळीवर भक्कम नेतृत्व देण्यात अपयश आले आहे. प्रदेश कॉंग्रेसदेखील सध्या अंधारात चाचपडताना दिसते. 

गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीवरही प्रशांत किशोर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रचार प्रियांका गांधी यांनी करायचा की राहुल यापेक्षा प्रशांत किशोर यांना नेमके कोण हवे हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे एका कॉंग्रेस नेत्याने सांगितले. प्रशांत यांनी बूथ कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरवात केली असून, महत्त्वाच्या नेत्यांशी ते दूरध्वनीवरून संवाद साधत आहेत. अन्य पक्षांनी आपले उमेदवार निश्‍चित केले असताना कॉंग्रेसमधील अंतर्गत संघर्ष मात्र काही केल्या संपायला तयार नाही, यावर अनेक नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

विजयी मतदारसंघांत प्रचार 
ज्या मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची अधिक शक्‍यता आहे, अशाच ठिकाणी प्रियांका गांधी यांच्या सभा घेण्याचे नियोजन प्रशांत किशोर यांनी आखले आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमने असे दीडशे मतदारसंघ निश्‍चित केले आहेत. पक्षांतर्गत मतभेदांमुळे कॉंग्रेस पक्षाचेच सर्वाधिक नुकसान होत असल्याचे बोलले जाते. 

फाइव्ह स्टार इफ्तार 
मध्यंतरी दुष्काळामुळे अखिल भारतीय कॉंग्रेस समिती आणि प्रदेश कॉंग्रेस यांनी इफ्तार पार्टी रद्द केली होती; पण त्यानंतर कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मेजवानी आयोजित केल्याचे उघड झाले. प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी जरी याचे समर्थन केले असले, तरीसुद्धा केंद्रीय नेते मात्र यामुळे नाराज झाले आहेत. 
 
"पीकें‘चा प्लॅन 
प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बूथनिहाय स्वतंत्र प्लॅन तयार केला असून, प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या प्रचाराला कधी सुरवात होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील दोन महिने आक्रमक प्रचार करण्याचे नियोजन कॉंग्रेसने आखले आहे, अशी माहिती पक्षाच्या बड्या नेत्यांनी दिली.