राष्ट्रपतीपदासाठी “यूपीए’कडून मीरा कुमार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

कोविंद हे दलित समाजातील असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस देखील दलित समाजातील मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्या कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जातात

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत "एनडीए'चे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (यूपीए) उमेदवाराची चर्चा सुरू झाली होती. आज (गुरुवार) यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून आता ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या त्या कन्या आहेत.  कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वतः कुमार यांच्या नावाची घोषणा केली. 

राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने व्हावी यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करीत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माकपचे नेते प्रकाश कारत, सीताराम येचुरी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. शहा यांनी चर्चा केली पण, "एनडीए'चे संभाव्य उमेदवार कोण असतील याविषयी गुप्तता पाळली होती. भाजपने स्वपक्षातील रथीमहारथींना धक्का देत त्यांनी कोविंद यांचे नाव जाहीर केले.

कोविंद यांचे नाव जाहीर झाल्यानंतर विरोधक त्यांच्या नावाला पसंती देतील अशी चर्चाही रंगू लागली. कोविंद हे दलित समाजातील असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस देखील दलित समाजातील मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्या कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आजपर्यंत केंद्रात मंत्री होण्याबरोबरच लोकसभेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मीराकुमार भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत होत्या. त्यांना राजकारणाबरोबरच प्रशासनाचाही दांडगा अनुभव आहे. मीराकुमारांना सर्वच पक्षात आदराचे स्थान आहे. 1985 मध्ये बिजनौर लोकसभा मतदारसंघातून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. 2004 मध्ये तर त्या बिहारमधील सासाराम लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष बनण्याचा मानही त्यांना मिळाला.