कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश कुमार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

''विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान, सन्मान अबाधित राहावा म्हणून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला''.

- बी. एस. येडियुरप्पा

बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीनंतर जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. कुमारस्वामी यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज घेण्यात आली. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद मागणाऱ्या भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश कुमार यांची अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपकडून विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा करण्यात आला होता. या पदासाठी भाजपचे एस. सुरेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तशी रणनीतीही आखण्यात आली होती. मात्र, भाजपने अध्यक्षपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी मागे घेतला. त्यावेळी येडियुरप्पा म्हणाले, ''विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान, सन्मान अबाधित राहावा म्हणून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला''. दरम्यान, भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसच्या रमेश कुमार यांची विधानसभेत बिनविरोध निवड झाली. 

Web Title: Congress Ramesh Kumar elected as speaker of Karnataka Legislative Assembly