कर्नाटक काँग्रेसच्या विजयाने सिद्धरामय्यांच्या 'पंजा'त बळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

काँग्रेसचे माजी मंत्री व दलित नेते व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बंगळूर : कर्नाटकमधील दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याने पुढील वर्षी येथे होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाला जनतेकडून उत्तेजन मिळाले आहे. 

नंजनगुड विधानसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेससमोर आव्हान उभे केले होते, मात्र काँग्रेसचे उमेदवार कलाले केशव मूर्ती यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपवर मात केली. काँग्रेसचे माजी मंत्री व दलित नेते व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी सिद्धरामय्यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात ही निवडणूक लढवली, मात्र 21 हजार 334 मतांनी त्यांचा दारूण पराभव झाला. 

तसेच, गुंदलूपेट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मंत्री व पाचवेळा आमदार झालेले महादेव प्रसाद यांच्या मृत्युमुळे येथे पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने उमेदवार म्हणून प्रसाद यांच्या विधवा पत्नी गीता महादेव प्रसाद उभ्या राहिल्या होत्या. गीता यांचा 11 हजार मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे निरंजन कुमार यांचा पराभव केला.