वाघेलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची कॉंग्रेसला चिंता

महेश शहा
शुक्रवार, 19 मे 2017

सध्या आठवडा भराच्या चीन दौऱ्यावर असलेले वाघेला मोदींच्या गुजरात भेटीनंतर मायदेशी परतणार आहेत. गुजरात भाजप वाघेलांच्या स्वागतासाठी उत्सुक असला तरीसुद्धा त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच आहे

अहमदाबाद - गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून कॉंग्रेस नेते शंकरसिंह वाघेला आपल्या आठ समर्थक आमदारांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. वाघेलांच्या या संभाव्य भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसांपासून गुजरात कॉंग्रेसमधील संघर्ष शिगेला पोचला असून नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

आगामी निवडणुकीत आपल्यालाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले जावे यासाठी वाघेला आग्रही असून या पदासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनीही कंबर कसल्याचे दिसून येते. सध्या कॉंग्रेसमध्ये "वाघेला विरूद्ध सोळंकी' असा उभा संघर्ष निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवड समितीमध्येही आपल्यालाच प्राधान्य दिले जावे असे वाघेला यांना वाटते. तत्पूर्वी वाघेला यांनी आपण लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते पण नंतर काही दिवसांतच त्यांनी यू-टर्न घेतला. सोळंकी यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे काढून घेतली जावीत म्हणून वाघेला आग्रही आहेत. या पदासाठी त्यांनी अमरेलीचे कॉंग्रेस आमदार परेश धनानी यांचे नाव पुढे केले आहे.

पुनर्वसन कसे करणार?
शंकरसिंह वाघेला यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीमध्ये एका बंडाचाही समावेश आहे, त्यांनी 1995 मध्ये भाजपच्या केशुभाई पटेल यांच्याविरोधात बंड केले होते. या बंडामुळे पटेल यांना सत्ता गमवावी लागली होती. सध्या आठवडा भराच्या चीन दौऱ्यावर असलेले वाघेला मोदींच्या गुजरात भेटीनंतर मायदेशी परतणार आहेत. गुजरात भाजप वाघेलांच्या स्वागतासाठी उत्सुक असला तरीसुद्धा त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच आहे. वाघेला जुलैमध्ये 77 वर्षांचे होतील, भाजपच्या पक्ष घटनेनुसार 75 पेक्षाही अधिक वय असणारा कोणताही नेता निवडणूक लढवू शकत नाही.

कॉंग्रेसला फटका
वाघेला यांच्या रूपाने प्रदेश भाजपला एक अभ्यासू आणि अनुभवी नेता मिळणार आहे. भविष्यामध्ये वाघेलांना भाजपच्या केंद्रीय समितीवर एखादे पद मिळू शकते तसेच त्यांचे पूत्र महेंद्रसिंह वाघेला यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतल्या जावू शकते. सध्याची परिस्थिती वाघेला आणि भाजपसाठी "विन विन' अशीच आहे. कॉंग्रेसच्या 57 पैकी 36 आमदारांनी भावी मुख्यमंत्री म्हणून वाघेलांच्या नावास पसंती दिली असून त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठे खिंडार पडू शकते.

Web Title: Congress worried in Gujarat