संघाच्या इफ्तार पार्टीत फक्त गायीचे दूध

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

रमजान महिन्यात रोजा सोडण्यासाठी गायीचे दूध घेण्यात येणार आहे. इफ्तार पार्टीत गायीचे दूध आणि त्यापासून बनविलेले पदार्थ देण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशात अशी पार्टी पहिल्यांदाच होणार आहे.

लखनौ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुस्लिम विंगकडून यंदाच्या रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येणार असून, या पार्टीत फक्त गायीचे दूध आणि गायीच्या दूधाकडून बनविण्यात आलेले पदार्थ खाण्यासाठी दिले जाणार आहेत.

गाय वाचविण्याचा संदेश म्हणून या पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या रमजान महिन्यात संघाच्या मुस्लिम विंगने गोमांस खाल्ल्याने होणाऱ्या रोगांबाबतही माहिती देण्यात येणार आहे. संघाचे माजी सरसंघचालक के. सी. सुदर्शन यांनी 2002 मध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचाची स्थापना केली होती.

राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील अध्यक्ष महिराजध्वज सिंह यांनी सांगितले, की रमजान महिन्यात रोजा सोडण्यासाठी गायीचे दूध घेण्यात येणार आहे. इफ्तार पार्टीत गायीचे दूध आणि त्यापासून बनविलेले पदार्थ देण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशात अशी पार्टी पहिल्यांदाच होणार आहे. गायीचे दूध शरीरासाठी चांगले असून, दूधापासून बनविलेले तूप औषध बनविण्यासाठी वापरले जाते, याबाबत मुस्लिमांना माहिती झाली आहे. नमाज पठणावेळीही गायींच्या संरक्षणाचे आवाहन करण्यात येणार आहे.