महिनाभरापासून बंदमुळे दार्जिलिंगमध्ये अन्नधान्याची टंचाई

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

दार्जिलिंग: वेगळ्या गोरखालॅंडसाठी "जीजेएम'ने पुकारलेल्या "बंद'ला आज महिना पूर्ण झाला. "बंद'चा परिणाम पर्यटन क्षेत्र आणि खाद्यान्न पुरवठ्यावर झाला असून, सध्या अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली आहे. दार्जिलिंगमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज, बॅंका, सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये आदी बंद असल्याचे चित्र आहे.

दार्जिलिंग, कर्सियांगमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाजीपाला पुरवठ्यावर फारसा परिणाम झाला नसला तरी तांदूळ, डाळी, साखर आदी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा विस्कळित झाला आहे. किराणा सामानासाठी नागरिक भटकंती करत असल्याचे चित्र दिसत आहे. नेहमीप्रमाणे आजही वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी येथील टुरिस्ट लॉजहून गोरखालॅंड समर्थकांनी रॅली काढली. मोर्चाने शहरात फेरी मारली.

मोटरस्टॅंड येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी पश्‍चिम बंगाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि गोरखालॅंडच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यापूर्वी 1988 मध्ये दार्जिलिंग 40 दिवस बंद होते; तर त्यानंतर 2013 मध्ये 44 दिवस बंद पुकारण्यात आला होता. दार्जिलिंग, कलिमपॉंग, सोनादा येथे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी जीजेएम आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे.