अंधत्वाची व्याख्या लवकरच बदलणार

पीटीआय
रविवार, 26 मार्च 2017

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांशी साधर्म्य ठेवण्यासाठी चार दशकांपासून वापरात असलेली अंधत्वाची व्याख्या बदलण्यास केंद्र सरकार सज्ज झाले आहे. यामुळे अंधत्वाबाबतची भारतातील माहिती जागतिक निकषांनुसार परिपूर्ण ठरू शकणार आहे.

नवी दिल्ल - जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांशी साधर्म्य ठेवण्यासाठी चार दशकांपासून वापरात असलेली अंधत्वाची व्याख्या बदलण्यास केंद्र सरकार सज्ज झाले आहे. यामुळे अंधत्वाबाबतची भारतातील माहिती जागतिक निकषांनुसार परिपूर्ण ठरू शकणार आहे.

भारतातील अंधत्व नियंत्रणासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार (एनपीसीबी) सहा मीटर अंतरावरून हाताची बोटे मोजू शकत नसलेल्या व्यक्तीची "अंध' या वर्गवारीत नोंद होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांत हे अंतर तीन मीटर आहे. "भारतातील सध्याच्या व्याख्येमुळे, भारतातील अंध व्यक्तींची संख्या जागतिक पातळीवर अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारताला निष्कारण अंधत्वाचे प्रमाण खरोखरच अधिक असलेल्या देशांच्या रांगेत बसविले जाते. म्हणूनच, जागतिक व्याख्येनुसारच भारतातील व्याख्या बदलून घेतली जाणार आहे,' असे "एनपीसीबी'च्या उपमहासंचालक प्रोमिला गुप्ता यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार, भारत सरकारसमोर अंधत्वाचे प्रमाण 0.3 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. कितीही प्रयत्न केले तरी सध्याच्या व्याख्येनुसार ते शक्‍य नाही. मात्र, व्याख्या बदलल्यास रुग्णांवर उपचार करून हे ध्येय गाठणे शक्‍य असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.