साथीमुळे दिल्लीकर हैराण; 'आप' प्रचारात व्यग्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

चिकुनगुनियामुळे काल (सोमवार) दिल्लीत तिघांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत डेंगीमुळे किमान दहा मृत्यू झाले आहेत; तसेच चिकुनगुनियाचे एक हजारांहून अधिक, डेंगीचे 1,100 हून अधिक आणि मलेरियाचे 21 रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत.

नवी दिल्ली : चिकुनगुनिया, डेंगी आणि तापाच्या साथीने दिल्लीतील जनता हैराण झालेली असताना दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मात्र गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रचाराच्या कामात व्यग्र आहेत. विशेष म्हणजे, वैद्यकीय उपचारांसाठी बंगळूरमध्ये असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जबाबदारी झटकत ‘दिल्लीच्या आरोग्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विचारा‘ अशी भूमिका घेतली आहे. 

‘दिल्लीतील प्रशासकीय प्रमुख कोण‘ या विषयावर ‘आम आदमी पार्टी‘च्या सरकारने न्यायालयात धाव घेतली आहे. ‘नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत‘ असा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला होता. या पार्श्‍वभूमीवर नायब राज्यपाल नजीब जंग आणि ‘आप‘ सरकार यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहे. 

‘आरोग्यासंदर्भात दिल्लीत उद्भवलेल्या समस्यांसाठी भाजपची सत्ता असलेली दिल्ली महानगरपालिकाच कारणीभूत आहे‘ अशी टीका ‘आप‘चे मंत्री कपिल मिश्रा यांनी केली. तसेच, ‘सत्येंद्र जैन आज दिल्लीत परततील. ते बाहेर असले, तरीही परिस्थितीचा सतत आढावा घेत आहेत,‘ अशी सारवासारवही मिश्रा यांनी केली. गोवा आणि पंजाबमधील आगामी निवडणुकांसाठी केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या प्रमुख मंत्र्यांनी या राज्यांचे दौरे करण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यात तातडीचा विषय मार्गी लावण्यासाठी दिल्ली सरकारने एका दिवसाचे अधिवेशन बोलाविले होते. त्यावेळी केजरीवाल पंजाबमध्ये प्रचारासाठी गेले होते. यावरून भाजपने ‘आप‘वर टीकास्त्र सोडले होते.