दिल्लीतील महाराष्ट्र सदन शिवमय

दिल्लीतील महाराष्ट्र सदन शिवमय

नवी दिल्ली - शिवछत्रपतींच्या जयजयकाराने नवी दिल्लीचा कोपरा न कोपरा आज दुमदुमला. ढोल-ताशाचा कडकडाट, वारकऱ्यांचा हरीनामाचा गजर, शिवकालीन युद्धकला व मल्लखांबची थरारक प्रात्यक्षिके अन्‌ पारंपरिक वेशभूषेत सहभागी शिवप्रेमींच्या अलोट उत्साहाने शिवजयंतीचा न्यारा थाट दिल्लीकरांनी अनुभवला.

भगवे फेटे, भगवे ध्वज व भगव्या साड्या नेसलेल्या मराठमोळ्या सुहासिनींमुळे दिल्लीचे वातावरण शिवमय झाले होते. खासदार संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, यौवराज शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेची दिल्लीत ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने येथे शिवजयंती प्रथमच साजरी झाली. दिल्लीमध्ये शिवजयंती साजरी करण्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून शिवप्रेमी येथे दाखल झाले होते. विविध ठिकाणांहून आलेल्या शिवप्रेमींनी सकाळी महाराष्ट्र सदनाकडे पावले वळवली. 

शिवछत्रपतींचे विचार देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवणे एक शिवभक्त म्हणून माझी जबाबदारी आहे. देशाच्या राजधानीत शिवजयंती साजरी करण्याची आम्हाला आज संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी जे सहकार्य केले, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 
- खासदार संभाजीराजे छत्रपती 

सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी महाराष्ट्र सदनबाहेरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भगव्या साड्यांमध्ये उपस्थित मुलीं समवेत त्यांनी छायाचित्रही काढून घेतले. शाहीर आझाद नायकवडी यांच्या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्र सदन रोमांचित झाले. पारंपरिक वेशभूषेत शिवप्रेमींची लगबग येथे सुरू झाली. वारकऱ्यांनी सदनातच "विठ्ठल विठ्ठल'चा गजर सुरू केला. खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे व शहाजीराजे यांचे याचवेळी सदनाच्या प्रवेशद्वारावर आगमन झाले. फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. रंगीबरेंगी फुलाच्या आकर्षंक सजावटीने प्रफुल्लीत झालेल्या सदनातील सभागृहात त्यांनी पाऊल ठेवताच, शिवप्रेमींचा उत्साह दुणावला. 

क्षणचित्रे... 

  • स्थानिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह दिल्लीतील मराठी बांधवांचा उत्साही सहभाग 
  • शिवप्रेमींच्या गर्दीत घुमली महाराष्ट्र सदनात शिवगर्जना 
  • हत्ती, घोडे ठरले मिरवणुकीचे आकर्षण 
     

शिवजन्मकाळ सुरू झाल्यावर सभागृह स्तब्ध झाले. संभाजीराजे यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले. आझाद व मनीषा नायकवडी यांनी पाळणा गीत गायिले. त्यानंतर वारकऱ्यांच्या दिंडीत संभाजीराजे यांनी फेर धरला. फुलांनी सजलेली पालखी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी सदनातून बाहेर पडली, तर ढोल-ताशाच्या कडकडाटाने वातावरण दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ, मावळे यांच्या वेशभूषेत आलेल्या शिवप्रेमींनी साडे तीनशे वर्षांपूर्वीचा काळ उभा केला. 

मुख्य प्रवेशद्वारावरून ध्वजधारी घोड्यावरून पुढे जाताच शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष सुरू झाला. "तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊँ - जय शिवराय' "छत्रपती शिवाजी महाराज की जय',"जय भवानी जय शिवाजी","राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय', "रणरागिनी ताराराणी की जय'चा गगनभेदी जयघोषाने दिल्लीकरांनी युगप्रवर्तक शिवरायांच्या वारसा सांगणाऱ्या शिवप्रेमींचा उत्साह अनुभवला. नाकात नथणी, कपाळावर चंद्रकोर, भगव्या व हिरव्या साड्या नेसलेल्या महिलांनी सुद्धा घोषणा देत दिल्लीकरांना अचंबित केले. मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी तर दिल्लीवासीयांच्या भुवया उंचावल्या. लाठी, पट्टा, लिंबू काढणी, तलवार, फरी गदका यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके टाळ्यांची दाद घेणारी ठरली. महाराष्ट्र सदन, अशोक रोड ते इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र या मार्गे शोभायात्रा काढण्यात आली. कला केंद्रासमोर शोभायात्रा आल्यानंतर ढोल ताशाच्या कडकडाटाने आसमंत दणाणले. येथे शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेसाठी दिल्ली पोलिसांची कुमक सकाळपासूनच हजर होती. शोभायात्रेचे त्यांच्याकडून चांगले नियोजन झाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. 

मोबाईलमध्ये सुवर्णक्षणाची नोंद 
शोभायात्रेची छायाचित्रे घेत शिवप्रेमींनी मोबाईलमध्ये सुवर्णक्षणाची नोंद केली. दिल्लीमध्ये शोभायात्रा काढून होत असलेल्या शिवजयंतीचा क्षण अनमोल आहे, तो कॅमेऱ्यात बंदिस्त करावा, यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. शोभायात्रेत अनेकांनी मोबाईलद्वारे छायाचित्रे टिपली. तसेच 
व्हीडिओ सुद्धा केले. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान येथून आलेल्या शिवप्रेमींनी ते तत्काळ फेसबूक, व्हॉट्‌सऍपवर शेअर केले. 

अधिकाऱ्यांचीही पारंपारिक वेशभुषेत उपस्थिती 
देशभरातील शिवप्रेमींच्या उत्साहाने दिल्लीत आज मराठीजणांचा घुमला आवाज. केंद्रात विविध पदांवर कायरत असलेले अधिकाऱ्यांनी सकाळी महाराष्ट्र सदनात हजेरी लावली. कुटुंबियांसह ते पारंपारिक वेशभुषेत ते आले होते. शिवजन्मकाळ सोहळ्यासाठी त्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. दुग्धविकास राज्य मत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हेही या वेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com