आयआयटी दिल्लीसह चार वेबसाईट हॅक 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

"पीएचसी' या हॅकर गटाने ही कृती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ""वेबसाईटवरून कोणताही मजकूर काढून टाकण्यात आलेला नाही, तसेच चोरण्यात आलेला नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे,'' असा संदेश त्यावर देण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू यांची अधिकृत संकेतस्थळे आज हॅक झाली. या संकेतस्थळांवर "पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या सर्व संकेतस्थळांवर "काश्‍मीरचा पाकिस्तान होईल' अशा आशयाचा मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला. 

"पीएचसी' या हॅकर गटाने ही कृती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ""वेबसाईटवरून कोणताही मजकूर काढून टाकण्यात आलेला नाही, तसेच चोरण्यात आलेला नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे,'' असा संदेश त्यावर देण्यात आला आहे. 

"तुमचे तथाकथित हिरो (सैनिक) काश्‍मीरमध्ये काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का? ते काश्‍मीरमध्ये अनेक निष्पाप लोकांना ठार मारत आहेत, याची कल्पना तुम्हाला आहे का? त्यांनी किती मुलींवर बलात्कार केला आहे, याची माहिती तुम्हाला आहे का? जर तुमच्या भावाला, बहिणीला, वडिलांना आणि आईला ठार मारण्यात आले तर कसे वाटेल? तुमच्या आई-बहिणींवर कोणी बलात्कार केल्यास कसे वाटेल?,'' असा संदेश वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. 

हॅकरनी या वेबसाईटवर दोन व्हिडिओही प्रकाशित केले. सर्व विद्यापीठांनी हॅकिंगच्या या प्रकाराची दखल घेतली असून, वेबसाईट सुरक्षित करण्याचे प्रयत्न तातडीने सुरू केले आहेत.